Join us

चिनी वस्तूंवर कर, फटका मात्र भारताला; अमेरिकेचा लिथियम बॅटरीवर जादा कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 07:12 IST

जगात कंटेनर्सची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा फटका भारताला बसत आहे. 

नवी दिल्ली : चीनवर लगाम लावण्यासाठी अमेरिकेने अनेक चिनी वस्तूंवर उच्च दराने आयात कर लावण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका मात्र भारताला बसत आहे.

सूत्रांनी सांगितले की, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने चीनमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर उच्च दराने आयात कर लावण्याचा निर्णय अलीकडेच घेतला. पोलाद, सोलार सेल, लिथियम आयन बॅटरी आणि तिचे सुटे भाग, इलेक्ट्रिक वाहने आणि औषधी उत्पादने यांचा त्यात समावेश आहे. उच्च आयात कर ऑगस्टपासून २०२६ पर्यंत टप्प्याटप्प्याने लागू होणार आहेत.

वाढीव आयात कर लागू होण्यापूर्वी जास्तीत जास्त माल अमेरिकेला निर्यात करण्याचा प्रयत्न चीनने सुरू केला असून, त्यासाठी जगभरातील कंटेनर्स मागविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जगात कंटेनर्सची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा फटका भारताला बसत आहे. 

युरोपियन संघ, कॅनडा यांनीही कर वाढवला 

सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेपाठोपाठ युरोपीय संघ आणि कॅनडा यांनीही चीनमधील वस्तूंवरील आयात कर वाढविला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली.  चीनमधील कंटेनर्सची मागणी आणखी वाढली. त्यातच लाल समुद्रातील संकटामुळे भारताकडे येणाऱ्या जहाजांना लांबचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे अनेक कंटेनर सेवादाता कंपन्या भारतात येण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.