लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सरकारी मालकीची एअर इंडिया कंपनी विकत घेण्यासाठी आता टाटा सन्स व स्पाइसजेट या दोघांमध्येच स्पर्धा असेल, असे स्पष्ट झाले आहे. या कंपनीच्या खरेदीसाठी अनेक कंपन्यांनी रस दाखविला होता. पण, त्यांच्या निविदा फेटाळल्या गेल्या आहेत, असे समजते.
एअर इंडियाच्या खरेदीत २२९ कर्मचाऱ्यांनीही रस दाखविला होता. त्यांच्या निविदेला अनिवासी भारतीय उद्योगपती लक्ष्मीप्रसाद आणि त्यांचा न्यू यॉर्कमधील इंटरप्स फंड यांचे पाठबळ होते. पण, त्यांचीही निविदा अपात्र ठरली आहे. याशिवाय एस्सार, डनलॉप व फाल्कन टायर्स यांनीही एअर इंडिया विकत घेण्याचे प्रयत्न चालविले होते. पण, त्यांच्या निविदा फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात आले. वरील कंपन्यांच्या तांत्रिक निविदा नामंजूर झाल्यानंतर आता टाटा सन्स व स्पाइसजेट यापैकी कोणाला एअर इंडियाचा ताबा मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थात टाटा व स्पाइसजेट यांच्या तांत्रिक निविदा मंजूर झाल्यानंतर आर्थिक निविदा तपासून पाहिल्या जातील. त्यांच्यापैकी सर्वांत अधिक रकमेची ज्यांची बोली असेल, त्या कंपनीलाच एअर इंडियाचा ताबा मिळेल.
कर्जाचा मोठा बोजा
एअर इंडिया ही कर्जाच्या बोज्याखाली बुडालेली सरकारी कंपनी असून, केंद्र सरकारने कंपनीला वेळावेळी आर्थिक मदतही केली होती. एअर
इंडिया विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने पूर्वीच घेतला होता. डोक्यावरील कर्जामुळे तिच्या विक्रीत असंख्य अडचणी येत होत्या. हा कर्जाचा भार विकत घेणाऱ्याने सोसायचा की केंद्र सरकारही काही तोटा सहन करणार, हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा होता.