Join us  

Former RBI Deputy Governor Viral Acharya: “देशातील महागाई ‘या’ ५ व्यवसायिक घराण्यांमुळे वाढली”; RBIच्या माजी अधिकाऱ्याचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 2:56 PM

Former RBI Deputy Governor Viral Acharya: या ५ बड्या ग्रुपचे विभाजन करणे हा यावरील उपाय असून, तरच देशातील महागाई कमी होऊ शकते, असा दावा रिझर्व्ह बँकेच्या माजी अधिकाऱ्याने केला आहे.

Former RBI Deputy Governor Viral Acharya: गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वसमान्यांना महागाईचे चटके अधिकच बसताना दिसत आहेत. इंधन, गॅस यांसह रोजच्या गरजेच्या वस्तुंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणावर कात्री लागताना दिसत आहेत. भारतातील चलनवाढ वेगाने होत आहे. यातच आता या महागाईला देशातील ५ व्यावसायिक कुटुंबे कारणीभूत करण्याचा मोठा दावा रिझर्व्ह बँकेच्या एका माजी अधिकाऱ्याने केला आहे. 

भारतातील मोजक्या पाच बड्या व्यावसायिक घराण्यांमुळे देशात महागी वाढली, असे मत आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी व्यक्त केले आहे. या पाच व्यावसायिक घराण्यांची नावे घेत त्यांनी देशात वाढत्या महागाईला ही पाच घराणे कारणीभूत आहेत, असा थेट आरोप विरल आचार्य यांनी केला. या घराण्यांकडे अफाट संपत्ती असून सुईपासून जहाज बनविण्यापर्यंतच्या व्यवसायात ते उतरले असल्याचे आचार्य यांनी म्हटले आहे.

त्यांनी राबविलेल्या धोरणांमुळेच देशात महागाई वाढली

देशातील वाढत्या महागाईला ही मोजकी ५ कॉर्पोरेट हाऊसेस जबाबदार असल्याचेही आचार्य यांनी म्हटले आहेत. हे विधान करताना त्यांनी या पाच कंपन्यांची नावे घेतली. यामध्ये रिलायन्स ग्रुप (Reliance Group), टाटा ग्रुप (Tata Group), आदित्य बिर्ला ग्रुप (Aditya Birla Group), अदानी ग्रुप (Adani Group) आणि भारती ग्रुप (Bharati Group) यांचा समावेश आहे. भारतातील या सर्वात मोठ्या कॉर्पोरेट हाऊसेस देशातील किरकोळ व्यापार ते थेट दूरसंचार क्षेत्रातील  किमतींवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता ठेवतात.देशातील जवळपास  प्रत्येक क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याची ताकद या घराण्यांमध्ये असून, त्यांनी राबविलेल्या धोरणांमुळेच देशात महागाई वाढली असल्याचे आचार्य म्हणाले आहेत. ईटीने या संदर्भात एक वृत्त दिले आहे.

सरकारने वेळोवेळी केली मदत

आर्थिक अडीअडचणीच्या काळात देशातील या कंपन्यांना सरकारने वेळोवेळी आर्थिक सहाय्य पुरविले आहे. परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव लागावा म्हणून सरकारने या कंपन्यांना शक्य तेवढी मदत केली असल्याचे विरल आचार्य यांनी म्हटले आहे.

म्हणून महागाई कमी झाली नाही

महागाई गगनाला भिडली आहे. अन्नधान्य, धातू, ऊर्जा, रिफाइन्ड पेट्रोलियम, तंत्रज्ञान या क्षेत्रात बड्या कंपन्यांचा विस्तार झाल्यामुळे ही क्षेत्रे पूर्णतः त्यांच्या ताब्यात गेली आहेत. सर्वसामान्यांच्या वापरात असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे दर जगभरात कमी होत असताना भारतात मात्र हे दर वाढत चालले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे काही ठराविक कंपन्यांकडे असलेली मक्तेदारी, असे विरल आचार्य यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या पाच कंपन्यांची भारतातील बाजारपेठेवर घट्ट पकड असून, यांनी ठरवलेली आर्थिक धोरणे परिणामकारक ठरत आहेत. यावर उपाय सुचवताना विरल आचार्य यांनी म्हटले आहे की, सदर कंपन्यांना छोट्या-छोट्या युनिट्समध्ये विभाजित केले तर कदाचित देशातील महागाई कमी होऊ शकते. जेव्हा लहान युनिट्समध्ये या कंपन्या काम करू लागतील तेव्हा आर्थिक धोरणे ठरविण्याची त्यांची क्षमता कमी होईल. त्याद्वारे बाजारपेठेतील त्यांची मक्तेदारी कमी होईल, असेही विरल आचार्य यांनी म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकटाटारिलायन्सअदानीव्यवसाय