Join us

बिस्लेरीच्या अधिग्रहणाला ‘टाटा’, आता जयंती चौहानच सांभाळणार व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 3:44 PM

आता लोकप्रिय कंपनी बिस्लेरीची विक्री होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

आता लोकप्रिय कंपनी बिस्लेरीची विक्री होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी कंपनीचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी या प्रकरणाला पूर्णविराम दिला. आता बिस्लेरी कंपनीची विक्री करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. कंपनीचं कामकाज आतात्यांची मुलगी जयंती चौहान सांभाळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिस्लेरी कंपनीची विक्री होणार अशा बातम्या येत होत्या. मात्र सोमवारी कंपनीच्या अध्यक्षांनी या प्रकरणाला पूर्णविराम दिला. आता बिस्लेरी कंपनी विकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनी आधीच 'हिमालयन' ब्रँड अंतर्गत बाटलीबंद पाण्याची विक्री करते. याशिवाय, टाटा कॉपर प्लस वॉटर आणि टाटा ग्लुकोप्लस या ब्रँडचीही मालकी आहे. टीसीपीएलनं बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय मजबूत करण्यासाठी बिस्लेरी ब्रँडमध्ये भाग घेण्यासाठी चर्चा सुरू केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता बिस्लेरी अधिग्रहणाचा करार रखडला आहे. टाटासोबत बिस्लेरीचा करार जवळपास अंतिम टप्प्यात होता, पण ही प्रक्रिया ठप्प पडली. मात्र, दोघांमधील बोलणी बंद झाल्यामुळं हा करार होणार नसून कंपनीची धुरा रमेश चौहान यांची मुलगी जयंती सांभाळणार आहे.

बिस्लेरी ही बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायातील सध्याच्या काळातील आघाडीची कंपनी आहे. पण रमेश चौहान यांची मुलगी जयंती व्यवसायात लक्ष घालत नसल्यानं रमेश चौहान यांनी कंपनी विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला होता असं सांगण्यात येत होतं. देशात बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ २० हजार कोटी रूपयांची असून त्यापैकी ६० टक्के हिस्सा असंघटित आहे, ज्यामध्ये बिस्लरीचा वाटा ३२ टक्के आहे. अशा स्थितीत ही कंपनी टाटांनी झोळीत पडली असती तर बाजारातील टाटांचे वर्चस्व आणखी वाढू शकलं असतं, असं सांगितलं जात आहे. 

कोण आहेत जयंती चौहान?४२ वर्षीय जयंती चौहान सध्या बिस्लेरीच्या उपाध्यक्षा आहेत. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी वडिलांच्या कंपनीत मदत करायला सुरुवात केली. मात्र, गेल्या काही काळापासून कंपनीला पुढे नेण्यासाठी त्या खूप सक्रिय होत्या. त्या आपल्या लिंक्डइन प्रोफाईलवरुन कंपनीला प्रमोट करत असतात.

अलीकडेच, कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ॲपवरून पाणी ऑर्डर करण्याची सुविधा सुरू केली आहे. ही माहिती खुद्द जयंती यांनी आपल्या लिंक्डइन प्रोफाइलवर शेअर केली होती. याशिवाय बिस्लेरीनं आयपीएल टीम मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्ससोबतही करार केला आहे.

 

 

टॅग्स :व्यवसायटाटा