टाटा ग्रुपचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन गेल्या पाच वर्षांपासून मुंबईतील एका इमारतीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. त्यांनी आता तेच घर विकत घेतले आणि अब्जाधीश मुकेश अंबानींचे शेजारी बनले आहेत. पेडर रोडवरील ३३ साऊथ नावाच्या अलिशान टॉवरमध्ये ११ व्या मजला आणि १२ वा मजला त्यांनी विकत घेतला आहे.
चंद्रशेखरन यांनी राहताच डुप्लेक्स फ्लॅट विकत घेतला आहे. हा ६००० स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे. यासाठी ते दर महिन्याला २० लाख रुपयांचे भाडे देत होते. टाटा ग्रुपच्या अध्यक्षांना टाटाने २०२१ मध्ये ९१ कोटी रुपये पगार आणि अन्य भत्ते दिले होते. चंद्रशेखर राहतात त्या इमारतीच्या बाजुलाच मुकेश अंबानींचे अँटिलिया हे निवासस्थान आहे.
या खरेदी व्यवहाराशी संबंधीत एका सुत्राने टाईम्स ऑफ इंडियाला याची माहिती दिली आहे. २१ फेब्रुवारी २०१७ मध्ये टाटा सन्सची जबाबदारी घेतल्यावर चंद्रशेखरन या इमारतीमध्ये राहण्यासाठी आले होते. या व्यवहाराबाबत टाटा ग्रुपच्या प्रवक्त्याने बोलण्यास नकार दिला. चंद्रशेखरन यांना 20 फेब्रुवारी 2027 पर्यंत पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा टाटा सन्सचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
हा डुप्लेक्स फ्लॅट खरेदी करण्यासाठी चंद्रशेखरन यांनी ९८ कोटी रुपये मोजले आहेत. म्हणजेच एका स्क्वेअर फूटसाठी एक लाख साठ हजार रुपये. हा व्यवहार तीन दिवसांपूर्वी झाला आहे. बिल्डर समीर भोजवानी यांच्या जीवेश डेव्हलपर्स लिमिटेडकडून हा व्यवहार करण्यात आला आहे. भोजवानी आणि विनोद मित्तल यांनी हा टॉवर २००८ मध्ये बनविला होता.