BSNL 5G Network : जेव्हापासून टाटाने सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलशी हातमिळवणी केली आहे. तेव्हापासून एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, जिओ या नेटवर्क कंपनीचे धाबे दणाणले आहेत. लोक मोठ्या संख्येने बीएसएनएलमध्ये नंबर पोर्ट करुन घेत आहेत. सध्या बीएसएनएल केवळ ४ जी सेवा देत आहे. मात्र, लवकरच कंपनी ५जी सेवा लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
देशातील सरकारी कंपनी BSNL लवकरच टाटा कंपनीच्या मदतीने दिल्ली-NCR मध्ये 5G नेटवर्क आणण्याच्या तयारीत आहेत. यानंतर ही सेवा देशातील इतर भागातही पोहचवण्यात येणार आहे. बीएसएनएलने अलीकडेच दिल्ली-NCR मध्ये १,८७६ पॉइंट्सवर 5G सेवा सुरू करण्यासाठी निविदा काढली होती, ज्यामध्ये तेजस नेटवर्क (टाटाची होल्डिंग कंपनी), लेखा वायरलेस आणि गॅलोर नेटवर्क यांनी BSNL ला मदत करण्यासाठी बोली लावली आहे.
टाटाची होल्डिंग कंपनी तेजस नेटवर्क
तेजस नेटवर्क्स ही बेंगळुरूस्थित कंपनी आहे, ज्यात टाटा सन्सचा बहुसंख्य हिस्सा आहे. ही टीसीएस कंपनीच्या नेतृत्वाखालील संघाचा भाग आहे. अशा परिस्थितीत तेजस नेटवर्कने बोली जिंकल्यास कंपनी दिल्ली-एनसीआरमध्ये 5जी नेटवर्क सुरू करण्यासाठी बीएसएनएलला मदत करेल.
बीएसएनएल १ लाख ४G साइट्स ५G मध्ये रूपांतरित करणार
बीएसएनएल लवकरच देशभरातील एक लाख 4G साइट्सना 5G नेटवर्कवर अपग्रेड करण्याची तयारी करत आहे. सध्या ५G नेटवर्क देणाऱ्या आघाडीच्या एअरटेल आणि जिओ कंपनीला यामुळे मोठा स्पर्धक मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांत जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे प्लॅन महाग झाल्यानंतर लाखो लोक बीएसएनएलच्या सेवेकडे वळले आहेत.
बीएसएनएलने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ७०:३० रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलवर निवडक बोलीदारांसह ५G नेटवर्क तयार करण्यासाठी निविदा जारी केली होती. ज्यामध्ये देशी-विदेशी कंपन्यांनी रस दाखवला आहे. त्याचबरोबर फिनलंडच्या नोकिया आणि स्वीडिश एरिक्सनसारख्या कंपन्यांनी त्यात काही बदल करण्याची मागणी केली आहे.