मुंबई : या वर्षी टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स या नव्या कंपनीची विक्री ८ टक्क्याने वाढली आहे. ही वाढ नित्योपयोगी उत्पादन क्षेत्राच्या वाढीपेक्षा दुप्पट आहे. भविष्यातही ही वाढ कायम ठेवता येईल, अशी आम्हाला आशा असल्याचे कंपनीचे मुख्य मानव संसाधन प्रमुख अमित चिंचोलीकर यांनी सांगितले.गेल्या १० फेब्रुवारीला टाटा समूहाने आपला खाद्यान्न ब्रँड संपन्न, मिनरल वॉटर ब्रँड हिमालयन शीतपेय व आंतरराष्ट्रीय व्यवसाय याचे विलीनीकरण करून टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्सची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे संपन्न या ब्रँडमध्ये कडधान्ये, डाळी व मसाल्यांचाही समावेश आहे. यात आम्ही पुढील वर्ष-दीड वर्षात अनेक नवी उत्पादने बाजारात आणणार आहोत, असे चिंचोलीकर म्हणाले.पुण्यातील आमच्या संशोधन केंद्रित २० ते ३० नव्या खाद्यपदार्थांवर प्रयोग सुरू असून त्यात तांदूळ व पोहे यांचाही समावेश आहे. आमचा मुख्य भर सकस खाद्यपदार्थ देऊन ग्राहकांचे स्वास्थ्यही जोपासण्यावर आहे, त्यामुळे आम्ही पॉलीश न केलेली तूरडाळही बाजारात आणली आहे, असे चिंचोलीकर यांनी सांगितले.टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्सकडे खाद्यपदार्थ मिनरल वॉटर, चहा, शीतपेये याची अनेक उत्पादने असून ती टाटा समूहाच्या विपणन व्यवस्थेतून शहरी व ग्रामीण भागातही उपलब्ध आहेत.सध्या देशातील नित्योपयोगी उत्पादनांच्या बाजारपेठेत टाटा समूहाचा वाटा २० टक्के आहे. नुकतेच आम्ही हिमालयन हे मिनरल वॉटर काचेच्या बाटलीत उपलब्ध केले. सध्या आमची एकूण उलाढाल ९३०० कोटींची आहे, असेही चिंचोलीकर म्हणाले.
'टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्सची विक्री मागे टाकेल नित्योपयोगी उत्पादनांना!'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 2:57 AM