Join us

केवळ अफवा... हल्दीराम विकत घेण्यावर टाटानं दिलं स्पष्टीकरण, एक दुकान ते स्नॅक्स मार्केटचा 'बादशाह'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 10:37 AM

टाटा समूह हल्दीराममधील ५१ टक्के भागभांडवल खरेदी करणार असल्याचं वृत्त एका वृत्तसंस्थेनं दिलं होतं.

टाटा समूहानं स्नॅक्स मेकर हल्दीराममधील ५१ टक्के भागभांडवल विकत घेण्याच्या वृत्तांचं स्पष्टपणे खंडन केलं आहे. बुधवारी, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स ही समूह कंपनी हल्दीराममधील मोठा हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत असून दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं वृत्त अनेक ठिकाणी प्रकाशित झालं होतं. रिपोर्टमध्ये हल्दीरामचं मूल्यांकन सुमारे १० अब्ज डॉलर्स असल्याचे सांगण्यात आले. आता टाटा समूहानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

स्नॅक्समधील दिग्गज कंपनी हल्दीरामची आता विक्री होणार असून ही कंपनी टाटा कन्झुमरच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केली जाणार असल्याची माहिती वृत्तसंस्थेच्या एका रिपोर्टमध्ये देण्यात आली होती. या वृत्तांचं खंडन करतानाच टाटा समूहानं अशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं म्हटलं. टाटा आणि हल्दीराम किमान ५१ टक्के भागभांडवल खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहेत. मात्र, यात सर्वात मोठा अडथळा हल्दीरामच्या मूल्यांकनाचा असल्याचा दावा रॉयटर्सच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. दरम्यान, टाटा कन्झुमर प्रोडक्ट्स बाजारात सुरू असलेल्या कोणत्याही अफवांवर प्रतिक्रिया देत नसल्याचं टाटाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे हल्दीरामनंही यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

८५ वर्षांपासून स्नॅक्स व्यवसायातसुमारे ८५ वर्षांपूर्वी म्हणजे १९३७ मध्ये भुजिया, नमकीन आणि मिठाई बनवणारी हल्दीराम यांची कंपनी सुरू झाली. युरोमॉनिटर इंटरनॅशनलच्या मते, भारतातील स्नॅक्स मार्केट सुमारे ६.२ अब्ज डॉलर्सचं आहे आणि हल्दीरामचा या मार्केटमध्ये सुमारे १३ टक्के वाटा आहे. या व्यतिरिक्त पेप्सीचेही या मार्केटवर वर्चस्व आहे आणि त्यांच्या लेज चिप्सचाही १२ टक्के वाटा आहे. हल्दीरामच्या उत्पादनांना केवळ भारतातच नाही तर सिंगापूर आणि यूएसए सारख्या परदेशी बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. कंपनीचे जवळपास १५० रेस्तराँ आहेत जे स्थानिक खाद्यपदार्थ, मिठाई आणि वेस्टर्न फूडची विक्री करतात.

टॅग्स :व्यवसायटाटा