tata electronics : शेजारी राष्ट्र चीन भारताला कायमच डोळे वटारुन पाहत असतो. मात्र, गेल्या काही वर्षात भारतानेही इनेक्ट्रॉनिक क्षेत्रात प्रगती करुन चीनला चांगलेच धक्के दिलेत. आयफोनचं उदाहरण घ्या. Apple कंपनीचा आयफोन १६ पूर्णपणे भारतात असेंबल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत टाटा कंपनीच्या एका डिलमुळे चीनला चांगल्याच मिरच्या झोंबतील. आयफोन संबंधात टाटा समूहाने थेट तैवानच्या कंपनीसोबत करार केला आहे. २ सुत्रांनी ही माहिती रॉयटर्सला दिली. Tata Electronics ने तैवानच्या भारतातील एकमेव आयफोन प्लांटमधील बहुसंख्य भागभांडवल खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. या करारातून एक नवीन संयुक्त उपक्रम उभारला जाईल. तो Apple पुरवठादार म्हणून टाटाला मजबूत करेल.
गेल्या आठवड्यात केलेल्या करारानुसार, यामध्ये टाटा इलेक्ट्रॉनिस्कचा ६० टक्के हिस्सा होणार आहे. यात दैनंदिन कामकाज टाटाद्वारे चालवले जाईल, तर Pegatron चे उर्वरित भागभांडवल असणार असून तांत्रिक सहाय्य त्यांचे असणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूत्रांनी डीलच्या आर्थिक स्थितीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. दुसरीकडे टाटांनीही यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. Apple आणि Pegatron कडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
चीनची पुरवठा साखळी तोडणार?
अॅपलचा पाठिंबा असलेला भारतातील एकमेव आयफोन प्लांट, पेगाट्रॉन टाटाला विकण्याबाबत चर्चा सुरू असल्याची बातमी रॉयटर्सने पहिल्यांदा एप्रिलमध्ये दिली होती. बीजिंग आणि वॉशिंग्टन यांच्यातील भू-राजकीय तणावादरम्यान, अॅपल चीनच्या पुकवठा साखळीत विविधता आणण्याचा विचार करत आहे. भारतातील टाटा साठी, चेन्नई पेगाट्रॉन प्लांट त्यांच्या आयफोन उत्पादन योजनांना चालना देईल. टाटा ही भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक असून आयफोन उत्पादनात झपाट्याने विस्तार करत आहे.
सीसीआयची परवानगी घ्यावी लागेल
हा करार शुक्रवारी आयफोन प्लांटमध्ये अंतर्गतरित्या अंतिम करण्यात आला, असे सुत्रांनी सांगितले. तर दोन्ही कंपन्या येत्या काही दिवसांत भारतीय स्पर्धा आयोगाकडून (CCI) मंजुरीसाठी अर्ज करण्याचा विचार करत आहेत. टाटा आधीच कर्नाटक या दक्षिणेकडील राज्यात आयफोन असेंब्ली प्लांट चालवत आहे, ज्याचा ताबा त्यांनी गेल्या वर्षी तैवानच्या विस्ट्रॉनकडून घेतला होता. ते तमिळनाडूच्या होसूरमध्ये आणखी एक इमारत बांधत आहे, जिथे त्यांचा आयफोन कंपोनट प्लांट देखील आहे. जो सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आला होता.