Join us

TATAने दिली गुड न्यूज; लवकरच Air India एक्स्प्रेसमध्ये शेकडो वैमानिकांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 1:09 PM

TATA Air India Express: हा एअरलाइनच्या योजनेचा हा एक भाग आहे.

TATA Air India Express: टाटा ग्रुपने एअर इंडियामध्ये अनेक बदल केलेले पाहायला मिळत आहे. एअर इंडियाला आघाडीची विमान कंपनी करण्यासाठी टाटा ग्रुप सर्व ते प्रयत्न करत आहेत. जगभरात एकीकडे नोकरकपातीची टांगती तलवार हजारो कर्मचाऱ्यांवर असताना दुसरीकडे टाटा ग्रुप एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये शेकडो वैमानिकांची नियुक्ती करणार आहे. हे वैमानिक सध्या प्रशिक्षण घेत आहेत. 

टाटा समूहाच्या मालकीची किफायत दरात सेवा पुरवणारी एअर इंडिया एक्सप्रेस लवकरच ३५० पायलट नियुक्त करणार आहे. या नियुक्तीनंतर एअरलाइनमधील वैमानिकांची संख्या सध्याच्या ४०० वरून जवळपास दुपटीने वाढणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक आलोक सिंग यांनी सांगितले की, पुढील वर्षभरात पायलटची संख्या ४०० वरून ८०० ते ९०० पर्यंत करण्यात येणार आहे. हा एअरलाइनच्या योजनेचा हा एक भाग आहे.

नवीन विमानांची किमान संख्या ७० वर पोहोचेल

एअर इंडिया ग्रुपमध्ये समाविष्ट असलेल्या ४ एअरलाइन्स, एअर इंडिया, विस्तारा, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर एशिया इंडिया यांच्या ताफ्यात २०२४ च्या शेवटपर्यंत अनेक नवीन विमाने दाखल होणार आहेत. यानंतर नवीन विमानांची किमान संख्या ७० वर पोहोचेल, असे सांगितले जात आहे. 

दरम्यान, एअर इंडिया एक्सप्रेस देशांतर्गत स्वस्त विमानसेवा देणारी कंपनी आहे. लवकरच Air Asia India चे विलिनीकरण केले जाणार आहे. टाटा समूह आपल्या विमान व्यवसायाचे एकत्रिकरण करण्याच्या प्रक्रियेत आहे. आगामी काही दिवसांत एअर इंडिया आणि विस्तारा यांचे विलिनीकरण करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :एअर इंडियाटाटा