Join us  

Alert! Air India च्या मोफत तिकिटांसाठी अ‍ॅप डाऊनलोड केलंय? कंपनीने दिला सावधगिरीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 3:48 PM

Air India Alert! एअर इंडियाचे मोफत तिकीट मिळवण्यासाठी तुम्ही एखादे अ‍ॅप डाऊनलोड केले असेल, तर सावध राहा.

नवी दिल्ली:  Air India ची TATA समूहाकडे घरवापसी झाल्यानंतर आता ही एअरलाइन आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यावर कंपनीने भर देण्यास सुरुवात केली आहे. कर्जाचा डोंगर असलेल्या एअर इंडियाचे परिचालन, संचालन अप-टू-डेट ठेवण्यासाठी टाटाने कंबर कसली आहे. यातच आता एअर इंडिया कंपनीने मोफत तिकिटांसाठी विकसित अ‍ॅपबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. एअर इंडियाकडून मोफत तिकिटांसाठी अ‍ॅप विकसित केले असल्याचे दावा एका जाहिरातीत करण्यात आला असून, असे सर्व दावे एअर इंडियाकडून फेटाळण्यात आले आहेत. 

एअर इंडियाने दावे फेटाळून लावताना एक नोटीसही बजावली आहे. बिल्डर डॉट एआय (Builder.ai) कंपनीकडून मुद्रित माध्यम आणि डिजिटल माध्यमांत जाहिरात मोहीम चालवली जात आहे. जाहिरातीत दावा केला आहे की, कंपनीने एअर इंडियासाठी अॅपचा प्रोटोटाइप विकसित केला आहे. एका जाहिरातीत क्यूआर कोड दिला आहे, जो त्या प्रोटोटाइप अॅपशी जोडलेला आहे. कंपनीने या अ‍ॅपपासून दूर राहण्यास सांगितले आहे. यासंदर्भातील माहिती देणारे एक ट्विट एअर इंडियाने केले आहे. 

फसवणूक झाल्यास कंपनी जबाबदार राहणार नाही

या अ‍ॅपवर एअर इंडियाचा लोगो दिसत असून, एअर इंडियाने असे कोणतेही अ‍ॅप विकसित करण्यास सांगितलेले नाही. त्यामुळे या अ‍ॅपच्या माध्यमातून कोणाचीही फसवणूक झाल्यास त्याला कंपनी जबाबदार राहणार नाही. जाहिरातीत असे म्हटले आहे की, जे ग्राहक हे अ‍ॅप डाउनलोड करतील, त्यांना एअर इंडियाचे मोफत तिकीट जिंकण्याची संधी मिळेल. एअर इंडियाकडून कोणतेही मोफत तिकीट दिले जात नाही. म्हणजेच बिल्डर.एआय (Builder.ai) कंपनीच्या नावाने सुरू असलेली जाहिरात बनावट असून त्यामध्ये अडकू नका, असे एअर इंडियाने म्हटले आहे. 

दरम्यान, टाटा समूह एअर इंडियाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करेल. एअर इंडियाची जवळपास सर्व विमाने अद्ययावत केली जातील. एअर इंडिया एअरलाइन्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञानाच्या बाबतीत सर्वांत हायटेक एअरलाइन बनवले जाईल. एअर इंडियाला पुन्हा सर्वोत्तम बनवण्यासाठी कंपनीची पुनर्रचना केली जाईल. भारताला जगाच्या प्रत्येक भागाशी जोडण्याचा आमचा उद्देश आहे, असे टाटा समूहाकडून सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :एअर इंडियाटाटा