TATA ग्रुपने विस्तारा ब्रँड संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. विस्तारा एअरलाइनचे टाटा समूह एअरलाइन एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाल्यानंतरही, पूर्ण-सेवा एअरलाइन एअर इंडिया म्हणून ओळखली जाईल. विस्तारा ब्रँड आता इतिहासजमा होईल. दरम्यान, सिंगापूर एअरलाइन्सने एअर इंडियामध्ये USD 267 मिलियन गुंतवण्याच्या योजने संदर्भत पुष्टी केली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा सन्समध्ये करार झाला होता. या करारानुसार सिंगापूर एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये 25.1 टक्के हिस्सा मिळणार आहे.
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सरकारकडून एअर इंडियाचा ताबा घेतल्यापासून टाटा समूह यात मोठा बदल करत आहे. या क्रमाने, विस्तारा एअर इंडियामध्ये विलीन होत आहे तर एअरएशिया इंडिया एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये विलीन होत आहे.
एअर इंडियाचे प्रमुख कॅम्पबेल विल्सन यांनी या संदर्भात माहिती दिली. 'टाटा समूह (TATA Group) एअर इंडिया आणि विस्तारा या दोन्हींचा वारसा पुढे नेण्यास उत्सुक आहे आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. “विस्ताराचे भारतीय विमान बाजारपेठेत मजबूत अस्तित्व आहे, पण एअर इंडिया भारताबाहेर प्रसिद्ध आहे आणि 90 वर्षांचा इतिहास आहे. भविष्यातील पूर्ण-सेवा विमान कंपनीला एअर इंडिया म्हटले जाईल पण विस्ताराचा काही वारसा कायम ठेवला जाईल, असंही त्यांनी म्हटले आहे.
14 फेब्रुवारी रोजी एअर इंडियाने 470 विमानांची ऑर्डर जाहीर केली होती. यापैकी 70 मोठ्या आकाराची विमाने आहेत. एअर इंडियाने एअरबस आणि बोईंगकडून 470 विमानांची ऑर्डर दिली आहे. यासोबतच विमान कंपनीकडे आणखी 370 विमाने खरेदी करण्याचा पर्याय आहे.
'आणखी 370 विमाने खरेदी करण्याच्या पर्यायासाठी कोणतीही अंतिम मुदत नाही. आम्ही बाजाराचे मूल्यांकन करू आणि त्यानंतरच याबाबत कोणतीही कारवाई केली जाईल,असं विल्सन म्हणाले.