आपल्या शेजारी देश पाकिस्तानची (Pakistan Economy) आर्थिक परिस्थिती कोणापासून लपलेली नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की एकट्या टाटा समूहाने (Tata Group) संपूर्ण पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, टाटा समूहाचं मार्केट कॅप ३६५ बिलियन डॉलर्स किंवा ३०.३० लाख कोटी रुपये आहे. त्याच वेळी, आयएमएफच्या अहवालानुसार, पाकिस्तानचा जीडीपी ३४१ बिलियन डॉलर आहे. म्हणजे एकटा टाटा समूह पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा आहे.
टाटा समूहाची व्याप्ती सोन्याच्या व्यवसायापासून ते सॉफ्टवेअरपर्यंत सर्वत्रच पसरलेली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं मूल्यांकन १५ लाख कोटी रुपये म्हणजेच १७० बिलियन डॉलर्स आहे. ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. त्यामुळे पाकिस्तानची अर्धी अर्थव्यवस्था टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या बरोबरीची आहे.
भारताच्या तुलनेत किती छोटी आहे अर्थव्यवस्था?
पाकिस्तानची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत ११ पटीनं लहान आहे. सध्या देशाचा जीडीपी सुमारे ३.७ बिलियन डॉलर्स आहे. आर्थिक वर्ष २०२८ मध्ये जपान आणि जर्मनीला मागे टाकत भारत आर्थिक तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास आहे. सध्या भारत ही ५ वी मोठी अर्थव्यवस्था आहे.
दुसरीकडे, पाकिस्तान सध्या कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. पाकिस्तानचं एकूण कर्ज आणि दायित्वे मिळून १२५ बिलियन डॉलर्स इतकं आहेत. त्याच वेळी, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह केवळ ८ बिलियन डॉलर्स आहे. यावर्षी सरकारला आपल्या महसुलातील ५० टक्के रक्कम कर्जाच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी खर्च करावी लागणार आहे.
वर्षभरात टाटांच्या या कंपन्यांची कमाल
गेल्या वर्षभरात टाटा मोटर्स आणि ट्रेंटच्या शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे टाटा समूहाचं मूल्यांकन वाढलं. गेल्या वर्षी दशकभरानंतर टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ आला होता. ज्यानं गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिलाय. टाटा टेक्नॉलॉजीज व्यतिरिक्त, टीआरएफ, ट्रेंट, बनारस हॉटेल्स, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा मोटर्स, ऑटो मोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा आणि आर्स्टन इंजिनिअरिंग यांनी एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.