Join us

TATA समूहाच्या कंपन्यांचं मार्केट कॅप ₹३० लाख कोटींपार, दूर दूरपर्यंत स्पर्धेत नाहीत अदानी-अंबानी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 10:06 AM

देशातील आघाडीचा उद्योगसमूह टाटा समूहाच्या मार्केट कॅपनं 30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

देशातील आघाडीचा उद्योगसमूह टाटा समूहाच्या मार्केट कॅपनं 30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील कोणत्याही व्यावसायिक घराण्यानं प्रथमच हा टप्पा गाठलाय. टाटा समूहाचं मार्केट कॅप 30.4 लाख कोटी रुपयांवर पोहोचलंय. त्यांच्या जवळ अद्याप कोणीही नाही. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाचं मार्केट कॅप 21.6 लाख कोटी रुपये आहे. गौतम अदानी यांच्या अदानी समूहाचं मार्केट कॅप 15.6 लाख कोटी रुपये आहे. या यादीत एचडीएफसी समूह चौथ्या क्रमांकावर आहे. या समूहाचं मार्केट कॅप 13 लाख कोटी रुपये आहे. 

बजाज समूह 10 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह देशातील पहिल्या पाच व्यवसायिक घराण्यांमध्ये सामिल आहे. टाटा समूहाच्या 25 लिस्टेड कंपन्या आहेत. एकूण मार्केट कॅपमध्ये फक्त पाच कंपन्यांचा हिस्सा 80 टक्क्यांहून अधिक आहे. समूहाची सर्वात मौल्यवान कंपनी म्हणजे टीसीएस, जिचं मार्केट कॅप 15.1 लाख कोटी रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर ही देशातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी आहे.

या आहेत टाटांच्या दिग्गज कंपन्या 

टाटा मोटर्स ही टाटा समूहातील टीसीएस नंतर दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी आहे. त्याची मार्केट कॅप 3.4 लाख कोटी रुपये आहे. ही देशातील सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी आहे. टायटन मार्केट कॅपच्या बाबतीत टाटा समूहात तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचं मार्केट कॅप 3.2 लाख कोटी रुपये आहे. टाटा स्टील 1.8 लाख कोटी रुपयांसह चौथ्या स्थानावर आणि टाटा पॉवर 1.3 लाख कोटी रुपयांसह पाचव्या स्थानावर आहे. या वर्षी ग्रुप आयटी कंपनी टीसीएसच्या मार्केट कॅपमध्ये 1.2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या वर्षी समूहाच्या मूल्यांकनात टीसीएसनं 60 टक्के योगदान दिलंय. त्याचप्रमाणे यावर्षी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 19 टक्क्यांची वाढ झाली असून टायटनला मागे टाकून ती टाटा समूहाची दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे.

टॅग्स :टाटारिलायन्सअदानीशेअर बाजार