मुंबई - टाटा ग्रुप १८ वर्षांनंतर कुठल्याही कंपनीचा आयपीओ बाजारात आणत आहे. टाटा मोटर्सने आयपीओच्या माध्यमातून आपली सहाय्यक कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज मध्ये अंशत: निर्गुंतवणुकीस मान्यता दिली आहे. २००४ मध्ये टीसीएसनंतर टाटा ग्रुपच्या कुठल्याही कंपनीचा देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये प्रवेश झालेला नाही. आता बऱ्याच वर्षांनी टाटा ग्रुपने कुठल्याही कंपनीचा आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सने सांगितले की, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा कंपनीच्या आयपीओ संबंधित घोषणा केल्या जातील.
टाटाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळातील हा पहिला आयपीओ असेल. चंद्रशेखरन यांनी २०१७ मध्ये टाटा ग्रुपचा कार्यभार स्वीकारला होता. टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्सने २०११ मध्ये २६० मिलियन डॉलरचे आयपीओ स्थगित केले होते. एका रिपोर्टनुसार टाटा स्काय (टाटा प्ले)सुद्धा लिस्टिंगच्या प्लॅनवर काम करत आहे. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत टाटा ग्रुपचे २९ एंटरप्रायझेस सार्वजनिकरीत्या मार्केटमध्ये लिस्टेड होते. त्यांची एकूण मार्केट कॅपिटलायझेशन ३१४ बिलियन डॉलर एवढी होती.
२०२२ च्या वार्षिक रिपोर्टनुसार टाटा मोटर्सच्या टाटा टेक्नॉलॉजीसमध्ये ७४ टक्के थोडी अधिक भागीदारी आहे. प्राथमिक माहितीनुसार कंपनी आयपीओमधून मिळालेल्या रकमेचा वापर हा टेक्नॉलॉजीच्या विस्तारासाठी करेल. मात्र, कंपनीने सांगितले की, सध्या हा आयपीओ मार्केटची परिस्थिती आणि रेग्युलेरटरीच्या मान्यतेवर अवलंबून असेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी एप्रिल ते जूनदरम्यान आपला आयपीओ मार्केटमध्ये आणू शकते. कंपनी १० टक्के भागीदारी आयपीओंतर्गत ऑफर करू शकते. आयपीओ आणण्याच्या दिशेने वेगाने काम होत आहे. त्यासाठी डीएचआरपी सेबीमध्ये दाखल केली जाईल.