Air India Handover: एअर इंडियाची मालकी अखेर टाटा समुहाकडे (Air India handover to TATA Group) सोपविण्यात आली. एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एअर इंडियामधील सरकारचा समभाग टाटा सन्सची उपकंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड (Tata Group) कंपनीकडे हस्तांतरीत करण्यात आला. आता एअर इंडियाची मालकी अधिकृतपणे टाटा कंपनीकडे गेली आहे. दरम्यान, संपूर्ण प्रक्रियेनंतर टाटा समुहानं एक विशेष फोटो शेअर करत एअर इंडियाचं स्वागत केलं.
टाटा समुहानं आपल्या ट्वीटरवर एअर इंडियाचं स्वागत करत Excited to take off with you! असा संदेश लिहिला आहे. यासोबतच एक सुंदर फोटोही टाटा समुहानं रिट्वीट केलाय. 'टाटा समुहाच्या एका भागाच्या रुपात एअर इंडियासाठी आता नवा चॅप्टर सुरू होत आहे. प्रवास पुढे नेण्यासाठी आता दोन आयकॉनिक नावं एकत्र आली आहेत. आपल्या देशसेवेची मोहीम आणि आमचा बहुमूल्य वारसा सोबत काम करण्यासाठी उत्साहित आहेत. टाटा कंपनीचं स्वागत,' असं ट्वीट एअर इंडियानं केलंय. तसंच कंपनीचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनीदेखील कर्मचाऱ्यांचं स्वागत केलं. याशिवाय चंद्रशेखरन यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली.