Join us

टाटा समूहाची बिस्लेरी इंटरनॅशनलमध्ये हिस्सा खरेदी करण्याची योजना; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 3:33 PM

Tata Group : कंपनी आधीच 'हिमालयन' ब्रँड अंतर्गत बाटलीबंद पाण्याची विक्री करते.

नवी दिल्ली : टाटा समूहाने बिस्लेरी इंटरनॅशनल या बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या कंपनीत हिस्सा घेण्यासाठी चर्चा सुरू केली आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली. यासंदर्भात घडामोडींची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की, चर्चा अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि कराराच्या निष्कर्षाविषयी काहीही सांगणे खूप घाईचे ठरेल.

टाटा समूह आपला ग्राहक व्यवसाय टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या (TCPL) बॅनरखाली चालवतो. कंपनी आधीच 'हिमालयन' ब्रँड अंतर्गत बाटलीबंद पाण्याची विक्री करते. याशिवाय, टाटा कॉपर प्लस वॉटर आणि टाटा ग्लुकोप्लस या ब्रँडचीही मालकी आहे. टीसीपीएलने बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय मजबूत करण्यासाठी बिस्लेरी ब्रँडमध्ये भाग घेण्यासाठी चर्चा सुरू केल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, यासदंर्भात संपर्क साधला असता टीसीपीएल आणि बिस्लेरी इंटरनॅशनल या दोघांनीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. बिस्लेरीच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'कंपनी बाजारातील चर्चेवर भाष्य करू इच्छित नाही.' तर, उद्योग तज्ज्ञांच्या मते, जर बिस्लेरी ब्रँडसोबत हा करार झाला तर टाटा समूहाची एफएमसीजी कंपनी टीसीपीएल वेगाने वाढणाऱ्या बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात मोठी भूमिका बजावू शकेल.

बाटलीबंद पाण्याच्या मार्केटमध्ये बिस्लेरीचे वर्चस्वमार्केट रिसर्च आणि अॅडव्हायझर टेकसाई रिसर्चच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 2020-21 या आर्थिक वर्षात देशातील बाटलीबंद पाण्याचे मार्केट जवळपास 19,315 कोटी रुपयांचे होते. लोकांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागरुकता वाढल्याने बाजाराची वार्षिक 13.25 टक्के वाढ अपेक्षित आहे. सध्या या बाजारात फक्त बिस्लेरीचेच वर्चस्व आहे. कोका-कोलाचा ब्रँड किनले, पेप्सीकोचा अॅक्वाफिना, पार्ले अॅग्रोचा बेली आणि आयआरसीटीसीचा ब्रँड रेल नीर यांचेही या मार्केटमध्ये मोठे नाव आहे.

टॅग्स :टाटाव्यवसायपाणी