नवी दिल्ली : सध्या एक कंपनी खरेदीसाठी टाटा ग्रुप, नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, क्राफ्ट हेन्झ, ओरक्ला आणि निसिन यांसारख्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येत आहे. ही कंपनी दुसरी कोणती नसून कॅपिटल फूड प्रायव्हेट लिमिटेड आहे. जी चिंग्स सीक्रेट स्मिथ अँड जोन्स ब्रँड अंतर्गत चायनीज फूड घरी बनवण्यासाठी मसाले तयार करते. ही डील जवळपास 1 ते 1.25 बिलियन डॉलर्स इतकी असू शकतो.
कॅपिटल फूड्सच्या तीन मुख्य भागधारकांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस कंपनीची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. कॅपिटल ग्रुपमध्ये इनव्हस ग्रुपचा 40 टक्के, अमेरिकास्थित प्रायव्हेट इक्विटी ग्रुप जनरल अटलांटिकचा 35 टक्के आणि कॅपिटल फूड्सचे संस्थापक अध्यक्ष अजय गुप्ता यांचा 25 टक्के हिस्सा आहे. दरम्यान, कंपनीची विक्री करण्यात येणार असल्याची पहिली बातमी 14 नोव्हेंबरला समोर आली होती.
टाटा ग्रुपची या कंपन्यांसोबत असेल स्पर्धा
कॅपिटल फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विकत घेण्यासाठी टाटा ग्रुप जगभरातील सर्वात मोठा फूड ग्रुप नेस्ले एसए, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, जपानी इन्स्टंट नूडल मल्टी नॅशनल कंपनी निसिन फूड्स, नॉर्वेची ओर्कला आणि जगातील पाचवी सर्वात मोठी फूड आणि बेव्हरेज कंपनी क्राफ्ट हेंझ यांच्यासोबत स्पर्धा करत आहे. जवळपास यासंबंधी माहिती असणाऱ्या सहा जणांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यांत स्पर्धेने वेग घेतला आहे.
कशी होईल डील?
एमटीआर आणि ईस्टर्न कंडिमेंट्सच्या पॅकेज्ड फूड व्यवसायाची मालकी ओरक्लाकडे आहे. बर्याच संभाव्य खरेदीदारांनी आधीच व्यवस्थापनासोबत बैठका घेतल्या आहेत आणि मे महिन्याच्या सुरुवातीला नॉन-बायडिंग बिड लावण्याआधी इतर काम करत आहेत. नेस्ले, एचयूएल, आयटीसी आणि टाटा कंझ्युमर यांनी मार्केटमधील चर्चेवर भाष्य करण्यास नकार दिला. तर जीए, गुप्ता, निसिन, क्राफ्ट हेंज आणि ओर्कलाकडून कोणतेही विधान आलेले नाही. हा व्यवहार रोखीने होणार की पार्ट स्टॉकमध्ये, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जाणकारांनी सांगितले की, काही संभाव्य खरेदीदारांनी कंपनीतील 75 टक्क्यांपर्यंत हिस्सा घेऊन सार्वजनिक करण्याचे सुचवले आहे.
किशोर बियाणी होते पहिले गुंतवणूकदार
कॅपिटल फूड्सला गुप्ता यांनी 1995 मध्ये 'देशी' चायनीज आणि इटालियन पोर्टफोलिओसह लाँच केले होते. या रेंजमध्ये चिंग्स सीक्रेट इन्स्टंट चायनीज नूडल्स, सूप, मसाले, करी पेस्ट आणि फ्रोझन एन्ट्री तसेच आले लसूण पेस्ट, सॉस आणि बेक्ड बीन्सची स्मिथ आणि जोन्स रेंजचा समावेश आहे. सर्वात आधी किशोर बियाणी यांनी या कंपनीला पाठिंबा दिला होता. किशोर बियाणी यांनी 13 कोटी रुपयांना कॅपिटल फूड्समधील 33 टक्के हिस्सेदारी विकत घेतली होती. 2013 मध्ये ते कंपनीतून बाहेर पडले. त्यानंतर, 2018 मध्ये जनरल अटलांटिकची बोर्डात एंट्री झाली.