Tata Group News : ज्येष्ठ उद्योजक दिवंगत रतन टाटा (Ratan Tata) यांच्यानंतर टाटा समूहाची जबाबदारी त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा (Noel Tata) यांच्याकडे सोपवण्यात आली. दरम्यान, आता टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळावर नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा ट्रस्टचे नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
गेल्या महिन्यात रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या टाटा सन्सच्या व्हर्च्युअल बैठकीत यासंदर्भातील ऑनलाइन ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नोएल टाटा समूहातील इतर कंपन्यांच्या संचालक मंडळावर कायम आहेत. टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स या दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळावर एकाच वेळी काम करणारे ते २०११ नंतर टाटा कुटुंबातील पहिले सदस्य असतील. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा ६६ टक्के हिस्सा आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
६७ वर्षीय नोएल टाटा यांच्यासोबतच वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह यांच्यासह टाटा ट्रस्टचे तीन नामनिर्देशित संचालक आहेत. नोएल टाटा, विजय सिंग, श्रीनिवासन आणि मेहाली मिस्त्री सध्या टाटा ट्रस्टवर नियंत्रण ठेवणाऱ्या कार्यकारी समितीचा भाग आहेत. टाटा सन्सनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
टाटा सन्स संचालक मंडळ
आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ऑफ टाटा सन्सनुसार, टाटा ट्रस्ट बोर्डावर एक तृतीयांश संचालकांची नियुक्ती करू शकते. सध्या टाटा सन्सच्या संचालक मंडळावर नऊ संचालक आहेत. यामध्ये अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्यासह दोन कार्यकारी संचालक, नोएल टाटा, श्रीनिवासन आणि विजय सिंग यांच्यासह तीन बिगर कार्यकारी संचालक आणि चार स्वतंत्र संचालकांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियुक्तीनंतर नोएल टाटा यांनी चंद्रशेखरन यांची भेट घेतली. नोएल टाटा सध्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्प, ट्रेंट अँड व्होल्टासचे चेअरमन आणि नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. टायटन आणि टाटा स्टीलमध्ये उपाध्यक्ष आणि नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदही त्यांनी भूषवलंय. रतन टाटा हे टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष होते. २०२२ मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळानं एकच व्यक्ती दोघांचीही प्रमुख होऊ नये यासाठी आपल्या एओएमध्ये बदल केला होता.
सेवानिवृत्तीचं वय काय?
नोएल टाटा यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी ग्रुप कंपन्यांमधील कार्यकारी भूमिका सोडली. समूहात या वयात निवृत्त व्हावं लागतं. तसंच अधिकाऱ्यांना वयाच्या ७० व्या वर्षी बोर्डाची सर्व पदं सोडणं बंधनकारक आहे. मात्र, विश्वस्त किंवा अध्यक्षांना निवृत्तीचं वय नाही. समूहाशी संबंधित तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार नोएल टाटा समूहातील कंपन्यांच्या अध्यक्षपदी कायम राहण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नाही, कारण ही नॉन-एक्झिक्युटिव्ह भूमिका आहे.