टाटा समूह आसाममध्ये तब्बल 40,000 कोटी रुपये खर्च करून एक सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याची योजना आखत आहे. यासंदर्भात खुद्द आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी माहिती दिली आहे. एवढेच नाही तर, राज्य सरकारसोबतच्या चर्चेनंतर, अंतिम मंजूरीसाठी केंद्रातील मोदी सरकारसोबतही संपर्क साधण्यात आला आहे. याला लवकरच मंजुरी मिळेलस अशी आशा आहे, असेही हिमंता यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलाताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "आपल्यासाठी एक फार चांगली बातमी आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने जगीरोडमध्ये एक इलेक्ट्रॉनिक केंद्र स्थापन करण्यासाठी एक अर्ज सादर केला आहे. त्यांनी जवळपास 40,000 कोटी रुपयांच्या खर्चासाठी भारत सरकारकडे एक प्रपोजल सादर केले आहे." सरमा म्हणाले, टाटा समूहाने सेमीकंडक्टर असेंबलिंग आणि पॅकेजिंग प्लांट संदर्भात राज्य सरकारसोबत सुरुवातीची चर्चा केली आहे आणि येथून समाधानी होऊन त्यांनी केंद्रासोबत संपर्क साधला आहे. महत्वाचे म्हणजे, मोरीगाव जिल्ह्यातील जगीरोड, राज्यातील सर्वात मोठे शह गुवाहाटी पासून जवळपास 55 किलोमीटर अंतरावर आहे.
कधीपर्यंत मिळणार मंजुरी? -
हिमंता म्हणाले, "जर सर्वकाही ठीक राहिले, तर आपल्याला राज्यात एक मोठी गुंतवणूक बघायला मिळेल. यामुळे औद्योगिकरणासाठी एक सकारात्मक वातावरण तयार होईल. आम्ही केंद्राच्या संपर्कात आहोत आणि एक अथवा दोन महिन्यांत अंतिम मंजुरी मिळेल, अशी आशा आहे." याशिवाय, कंपनीने रोजगारासाठी 1,000 लोकांना प्रशिक्षित करण्यासाठीही संपर्क साधला आहे," असेही हिमंता यांनी म्हटले आहे.