Tata Group Share Market :शेअर बाजारगुंतवणूकदारांसाठी मागील आठवडा खुप चांगला ठरला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) च्या टॉप-10 मौल्यवान कंपन्यांपैकी 7 च्या बाजारमूल्यात जोरदार वाढ झाली. या दरम्यान, टाटा समूहाच्या TCS ने गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा करुन दिला. पाच दिवसांतच कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या एकूण संपत्तीत 62,000 कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली.
सेन्सेक्स इतका वाढला
गेल्या आठवड्यात, बीएसई सेन्सेक्स 996.17 अंकांनी किंवा 1.24 टक्क्यांनी वाढून 80,893.51 अंकांच्या आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला. आठवड्याच्या शेवटी, शुक्रवारी सेन्सेक्सने 622 अंकांची किंवा 0.78 टक्क्यांनी उसळी घेतली आणि 80,519.34 च्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारातील या वाढीचा परिणाम कंपन्यांच्या बाजारमूल्यावरही दिसून आला. सेन्सेक्समधील टॉप-10 मौल्यवान कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये संयुक्तपणे 1,72,225.62 कोटी रुपयांची वाढ झाली.
टीसीएसचा सर्वाधिक नफा
गेल्या आठवड्यात टीसीएसच्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा झाला. TCS चे मार्केट कॅप पाच दिवसात 15,14,133.45 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 62,393.92 कोटी रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे, TCS ने गेल्या आठवड्यात पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. त्यानंतर TCS च्या शेअर्समध्ये 7% वाढ झाली.
टॉप 3 कमाई करणाऱ्या कंपन्या
TCS व्यतिरिक्त, ITC देखील गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्या कंपन्यांमध्ये होती. ITC मार्केट कॅप 31,858.83 कोटी रुपयांनी वाढून 5,73,258.78 कोटी रुपयांवर पोहोचले. याशिवाय देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे मार्केट कॅप 26,905.14 कोटी रुपयांनी वाढून 7,10,728.27 कोटी रुपये झाले. तर, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) देखील कमाईच्या बाबतीत पुढे राहिली. कंपनीचे मार्केट कॅप 22,422.12 कोटी रुपयांनी वाढून 6,64,947.01 कोटी रुपयांवर पोहोचले.
(नोट- शेयर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)