टाटा समूह हा देशातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक आहे. टाटा समूहामध्ये १०० पेक्षा अधिक कंपन्या आहेत आणि त्यांचा व्यवसाय जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. मीठ, पाणी, चहा-कॉफी, घड्याळं, ज्वेलरी, मेटल, कार अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचं वर्चस्व आहे. टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली या कंपन्यांनी यशाचं शिखर गाठलं आणि जगभरात विस्तारही केला. परंतु त्यांनी चेअरमन पद सोडल्यानंतर आता त्यांच्या शेकडो कंपन्या कोण सांभाळतं आणि त्यांच्याशी निगडीत निर्णय कसे घेतले जातात हे जाणून घेऊ.
१८६८ मध्ये सुरू झालेला प्रवास
टाटा समूहाचा प्रवास भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी १८६८ मध्ये एका ट्रेडिंग फर्मच्या रुपात सुरू झाला आणि आता याचा व्यवसाय देश-विदेशात पसरलेला आहे. शेअर बाजारात लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्यांसह जवळपास १०० सब्सडायरी कंपन्या मिळून आज व्यवसाय करत आहेत. आज त्यांचा व्यवसाय १०० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेला आहे.
१० लाखांपेक्षा अधिक लोकांना रोजगार
टाटा समूहाच्या महसुलाबद्दल बोलायचं झालं तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात ते १६५ अब्ज डॉलर्स होतं. त्याचबरोबर जगभरातील टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या (आर्थिक वर्ष २०२३ नुसार) १०,२८,००० वर पोहोचली आहे. समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मनुष्यबळाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे आणि एकट्या या कंपनीत ६,१४,७९५ कर्मचारी कार्यरत आहेत.
शेअर बाजारातील लिस्टेड कंपनी
- TCS
- Tata Steel
- Tata Motors
- Titan Company
- Tata Chemicals
- Tata Power
- Indian Hotels Company
- Tata Consumer Product
- Tata Communication
- Voltas Ltd
- Trent Ltd
- Tata Investment Corp
- Tata Metalikes
- Tata Elxsi
- Nelco Ltd
- Tata Tech
- Rallis India
टाटा सन्समध्ये ६६% हिस्सा TATA Trustचा
टाटा समूह आणि त्याच्या कंपन्यांमध्ये टाटा सन्स मुख्य प्रमोटर आणि प्रिन्सिपल इनव्हेस्टर आहे. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा ६६ टक्के हिस्सा आहे. रतन टाटा यांच्या राजीनाम्यानंतर चेअरमन एन. चंद्रशेखरन समूहाचं कामकाज पाहतात. परंतु टाटा ट्रस्टचा मोठा हिस्सा असल्यामुळे अनेक निर्णयांमध्ये चंद्रशेखरन यांच्याशिवाय रतन टाटा यांचीही महत्त्वाची भूमिका असते. टाटा समूहाच्या कंपन्यांचे हे व्यवसाय त्यांचं संचालक मंडळाचं मार्गदर्शन आणि देखरेखीखाली स्वतंत्ररित्या चालवलं जातं.