Join us

TATA ग्रुप तयारीला लागला! ‘ही’ कंपनी घेणार तब्बल १०००० हजार कोटींचे कर्ज; नेमका प्लान काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 4:03 PM

Tata Group Tata Capital: टाटा ग्रुपमधील एक कंपनी कोट्यवधींचे कर्ज घेण्याच्या तयारीत आहे.

Tata Group Tata Capital: गेल्या काही दिवसांपासून टाटा ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करताना दिसत आहे. शेअर मार्केटमधील टाटाच्या अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. विविध क्षेत्रातील कंपनी अधिग्रहणासोबतच व्यवसाय विस्तारावर टाटाचा भर असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता टाटा ग्रुप नव्या दमाने तयारीला लागला असून, समूहातील एक कंपनी आता १० हजार कोटींचे कर्ज घेण्यात असल्याची माहिती मिळाली आहे. या माध्यमातून टाटा समूहाचा मेगा प्लान असल्याचे म्हटले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या बोर्डाने टीसीएफएसएलच्या विलीनीकरणास मान्यता दिली आहे. टाटा कॅपिटल या कर्जाद्वारे आपला ताळेबंद वाढवण्याचा विचार करत आहे. तसेच, कंपनीला किरकोळ कर्ज धोरण अवलंबायचे आहे. कंपनी कर्ज म्हणून घेतलेल्या पैशाचा वापर गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज देण्यासाठी करेल. टाटा कॅपिटल ही बिगर बँकिंग वित्तीय संस्था आहे.

टाटा सन्सची टाटा कॅपिटलमध्ये मोठी गुंतवणूक

कर्ज घेण्याबाबत टाटा कॅपिटलकडून कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही. टाटा सन्सने टाटा कॅपिटलमध्ये गुंतवणूक केली आहे. २०१९ च्या आर्थिक वर्षात टाटा सन्सने टाटा कॅपिटलमध्ये २५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आर्थिक वर्ष २०२० मध्ये, पुन्हा एकदा टाटा सन्सने टाटा कॅपिटलमध्ये १ हजार कोटींची गुंतवणूक केली. टाटा कॅपिटल व्यतिरिक्त टाटा मोटर्स फायनान्स कर्ज देते. मात्र, ही कंपनी केवळ वाहने आणि डीलर्सनाच वित्तपुरवठा करते. जानेवारी २०२२ मध्ये, टाटा सन्सने SBI कडून १० हजार कोटी रुपये आणि बीओबीकडून ५ हजार कोटींचे कर्ज घेतले.

दरम्यान, टाटा समूह एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिस लिमिटेड (एईएसएल) खरेदी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. ही एअर इंडियाची उपकंपनी होती, जी खाजगीकरणाच्या वेळी वेगळी झाली होती. आता सरकार ती विकण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. सरकारी मालकीची एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी एमआरओ कंपनी आहे. २०२१-२२ मध्ये त्यांनी ४५० विमाने हाताळली आणि तिचा नफा ८४० कोटी रुपये होता. ही कंपनी विकत घेण्यासाठी टाटा समूहाने जर्मनीच्या लुफ्थांसा आणि फ्रान्सच्या एअर फ्रान्स-केएलएम यांच्याशी करार करून समूहही स्थापन केला आहे. कंपनीचे ६ हँगर आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :टाटा