Join us

TCS ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! कमावला ९,९२६ कोटींचा निव्वळ नफा; वर्षभरात ७.४ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 4:24 PM

TCS कंपनीचा व्यवसाय जगातील विविध ४६ देशांमध्ये पसरलेला आहे.

नवी दिल्ली: टाटा समूहातील अनेकविध कंपन्या आताच्या घडीला दमदार कामगिरी करत आहेत. टाटा समूहातील देशातील सर्वांत मोठी सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी लिमिटेड (TCS) कंपनीने चौथ्या तिमाहीची आकडेवारी जारी केली आहे. टीसीएस कंपनीने जानेवारी ते मार्च २०२२ या चौथ्या तिमाही महसुलात पहिल्यांदाच ५० हजार कोटींपुढील टप्पा ओलांडणारी कामगिरी केली आणि वार्षिक तुलनेत ७.४ टक्क्यांची वाढ नोंदवून ९,९२६ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद केल्याची माहिती देण्यात आली आहे. 

TCS कंपनीचा व्यवसाय जगातील विविध ४६ देशांमध्ये पसरलेला आहे. टीसीएसने सरलेल्या मार्च तिमाहीत महसुलात वार्षिक आधारावर १५.८ टक्क्यांच्या वाढीसह तो ५०,५९१ कोटी रुपयांवर नेला आहे. कंपनीचा वार्षिक महसूल प्रथम २५ अब्ज अमेरिकी डॉलरपुढे गेला आहे. रुपयांमध्ये त्याचे मूल्य १,९१,७५४ कोटी रुपये असे आहे. वार्षिक तुलनेत ते १४.८ टक्क्यांनी वाढले आहे. मध्यमकालीन सशक्त वाढीच्या दृष्टिकोनासह आणि आतापर्यंतची जास्तीत जास्त महसुली वाढ नोंदवून आर्थिक २०२१-२२ ची मजबूत कामगिरीसह आपण सांगता केली आहे, असे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी सांगितले. 

सर्वाधिक ३४.६ अब्ज डॉलरच्या ऑर्डर बुकची नोंद 

टीसीएसने चौथ्या तिमाहीमध्ये एकूण ११.३ अब्ज डॉलरच्या करार मूल्यासह, पूर्ण वर्षांसाठी आजवरच्या सर्वाधिक ३४.६ अब्ज डॉलरच्या ऑर्डर बुकची नोंद केली आहे. चौथ्या तिमाहीत टीसीएसने ३५,२०९ कर्मचारी जोडले, जे एका तिमाहीतील मनुष्यबळात झालेली सर्वाधिक वाढ आहे. सरलेल्या आर्थिक वर्षांच्या अखेरीस कंपनीतील पटावरील कर्मचाऱ्यांची संख्या ५,९२,१९५ इतकी होती, ज्यामध्ये वर्षभरात १,०३,५४६ अशी सार्वकालिक उच्च वाढ झाली आहे. विद्यमान २०२२-२३ आर्थिक वर्षांत ४०,००० नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीचे नियोजन असल्याचे कंपनीने जाहीर केले. 

टॅग्स :टाटा