नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून एकामागून एक सरस वाहने लॉंच करून Tata Motors आपल्या स्पर्धक कंपन्यांना तगडी टक्कर देताना दिसत आहे. टाटा मोटर्सच्या कार विक्रीतही मोठी वाढ झालेली दिसत आहे. तर इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा सकारात्मक परिणाम टाटा मोटर्सच्या व्यवसायावर झाला आहे. टाटाच्या वाहन विक्रीत १७.६ टक्क्यांनी वाढ झाली असून, महसुलातही टाटा मोटर्सने ३० टक्क्यांची वाढ नोंदवल्याची माहिती देण्यात आली आहे.
आघाडीची वाहन निर्माता कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने बुधवारी सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत ९४५ कोटी रुपयांच्या तोट्याची नोंद केली आहे. देशांतर्गत आघाडीवर वाणिज्य वाहनांची वाढलेली मागणी आणि जग्वार लँड रोव्हरच्या विक्रीत सुधारणा झाल्याने गतवर्षांतील या तिमाहीच्या तुलनेत तोटा पाच पटींनी कमी झाला आहे. कंपनीने गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर २०२१ या तिमाहीत ४,४४२ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला होता.
देशांतर्गत वाहन विक्री मोठ्या प्रमाणात वाढली
देशांतर्गत आघाडीवर वाणिज्य वाहनांच्या विक्रीत सरलेल्या तिमाहीत १५ टक्के वाढ झाली आहे. एकूण ९३,६५१ वाणिज्य वाहनांची विक्री करण्यात आली. मात्र या काळात केवळ ६,७७७ वाहनांची निर्यात करण्यात आली. जागतिक प्रतिकूल वातावरणामुळे निर्यातीत २२ टक्क्यांची घसरण झाली. कंपनीने वार्षिक आधारावर प्रवासी वाहनांच्या विक्रीत ६९ टक्के वाढ साधत १,४२,७५५ वाहनांची विक्री केली.
दरम्यान, टाटा मोटर्स कंपनीला दुसऱ्या तिमाहीत ८९८ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा झाला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत तो ४,४१६ कोटी रुपये होता. यादरम्यान कंपनीचा महसूल १५,१४२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी या तिमाहीत ११,१९७ कोटी रुपये होता. टाटा मोटर्स कंपनीचा भाग असलेल्या जग्वार लँड रोव्हरने दुसऱ्या तिमाहीत ५.३ अब्ज पाऊंडची कमाई केली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील कमाईपेक्षा ३६ टक्क्यांनी अधिक आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जेएलआरची जागतिक स्तरावर एकूण ७५,३०७ वाहनांची विक्री झाली, जी मागील वर्षांपेक्षा १७.६ टक्क्यांनी अधिक आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"