Share Market Investment: आताच्या घडीला शेअर बाजारात चढ-उतार होताना दिसत आहेत. जागतिक आव्हानांचा तसेच हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी ग्रुपचे कोसळलेले शेअर्स अशी अनेक कारणे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यातच टाटा समूहाच्या अनेक कंपन्या चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. टाटाच्या या कंपनीचा शेअर ५४० रुपयांवर जाऊ शकतो, असा कयास तज्ज्ञ वर्तवत असल्याचे सांगितले जात आहे.
टाटा समूहाच्या समभागांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टाटा मोटर्स ही टाटा समूहातील एक कंपनी आहे. कंपनीचे वर्तमान आणि भविष्यातील योजनांमुळे गुंतवणूकदार या कंपनीवर लक्ष ठेवून असतात, असे म्हटले जाते. टाटा मोटर्सला २१ महिन्यांनंतर अच्छे दिन आल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत ५४० रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा विश्वास ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी व्यक्त केला आहे.
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये २३ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालच्या मते, येत्या काही दिवसांमध्ये टाटा मोटर्सच्या शेअर्सची किंमत ५४० रुपयांच्या पातळीपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आगामी काळात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये २३ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. सध्या कंपनीचे शेअर्स ४४२ अंकांवर व्यवहार करत आहेत. चालू आर्थिक वर्ष ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत टाटा मोटर्सने ३ हजार कोटींचा निव्वळ नफा कमावला. या तिमाहीत वाहनांची चांगली विक्री झाल्याने कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच काळात कंपनीला १ हजार ४५१ कोटींचा तोटा झाला होता.
दरम्यान, शेअर मार्केटला पाठवलेल्या माहितीमध्ये कंपनीने सांगितले की, या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्नही ८८ हजार ४८९ कोटींवर पोहोचले. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ७२ हजार २२९ कोटी होती. टाटा समूहाच्या या कंपनीला ७ तिमाहीनंतर नफा झाला आहे.
(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"