नवी दिल्ली: एअर इंडियाची (Air India) घरवापसी TATA समूहाकडे झाल्यापासून अनेकविध बदल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. एअर इंडियाला बेस्ट एअरलाइन करण्यावर टाटाने भर द्यायला सुरुवात केली आहे. टाटा समूहाकडे एअर इंडियाची धुरा आल्यानंतर तुर्कीश एअरलाइनचे माजी सीइओ इल्केर आयची यांना एअर इंडियाचे प्रमुखपद देण्याचा निर्णय टाटाने घेतला होता. मात्र, यावर बराच वादंग झाला. यानंतर इल्केर आयची यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर आता टाटा समूहाने एअर इंडियाच्या प्रमुखपदी कॅम्पबेल विल्सन यांनी नियुक्ती केली आहे.
टाटा सन्सने एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कॅम्पबेल विल्सन यांची नियुक्ती जाहीर केली. एअर इंडियाच्या संचालक मंडळाने विल्सन यांच्या नियुक्तीला आवश्यक नियामक मंजुरीच्या अधीन राहून मान्यता दिली, असे कंपनीने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. कॅम्पबेल विल्सन ५० वर्षांचे असून, या सेवा उद्योगातील तब्बल २६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
एअर इंडियाच्या पुनर्बाधणी प्रक्रियेत निश्चितच फायदा होईल
कॅम्पबेल विल्सन हे सिंगापूर एअरलाइन्सच्या पूर्ण मालकीची किफायती दरातील प्रवासी विमान सेवा स्कूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहेत. आशियाईतील या क्षेत्रातील नामांकित नाममुद्रा घडविण्याच्या विल्सन यांच्या अनुभवाचा एअर इंडियाच्या पुनर्बाधणीच्या प्रक्रियेत निश्चितच फायदा होईल, असा विश्वास टाटा सन्स आणि एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी व्यक्त केला आहे. एअर इंडियालाही जागतिक दर्जाची विमान सेवा म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी सुरू झालेल्या या प्रवासात त्याच्यासोबत काम करण्यास आपण उत्सुक आहोत, असेही चंद्रशेखरन यांनी नमूद केले.