Join us

Tata Bisleri Deal: TCPLचा बिसलेरी अधिग्रहणाला ‘टाटा’; करार रखडला, कुठे माशी शिंकली! नेमके कारण जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 2:17 PM

Tata Bisleri Deal: जवळपास ७ हजार कोटींचा टाटा-बिसलेरीचा करार जवळपास अंतिम टप्प्यात होता. पण ही प्रक्रिया ठप्प पडल्याचे सांगितले जात आहे.

Tata Bisleri Deal:टाटा समूहाने बिस्लेरी इंटरनॅशनल या बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या कंपनीत हिस्सा घेण्यासाठी चर्चा सुरू करण्यात आली होती. टाटा समूह आपला ग्राहक व्यवसाय टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या (TCPL) बॅनरखाली चालवतो. हीच कंपनी बिसलेरी अधिग्रहण करणार होती. मात्र, आता हा करार होणार नसल्याचे सांगितले जात आहे. 

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनी आधीच 'हिमालयन' ब्रँड अंतर्गत बाटलीबंद पाण्याची विक्री करते. याशिवाय, टाटा कॉपर प्लस वॉटर आणि टाटा ग्लुकोप्लस या ब्रँडचीही मालकी आहे. टीसीपीएलने बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय मजबूत करण्यासाठी बिस्लेरी ब्रँडमध्ये भाग घेण्यासाठी चर्चा सुरू केल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता बिसलेरी अधिग्रहणाचा करार रखडला आहे. टाटासोबत बिस्लेरीचा करार जवळपास अंतिम टप्प्यात होता, पण ही प्रक्रिया ठप्प पडली.

टाटा समूह बाटलीबंद पाण्याची विक्री व्यवसायात अधिक मजबूत झाला असता

देशातील सर्वांत मोठ्या बाटलीबंद पाण्याच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेटमधील बहुसंख्य भागभांडवल खरेदीसाठी टाटा समूहाची चर्चा मुल्यांकनामुळे रखडली आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सने या संदर्भात कोणताही निश्चित करार किंवा बंधनकारक वचनबद्धता केली नाही, असे टाटा समूह कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे. आपला व्यवसाय संभाळण्यासाठी उत्ताराधिकारी नसल्याने बिसलेरीचे मालक रमेश चौहान यांनी गेल्या वर्षी कंपनी विक्रीची घोषणा केली होती. यासाठी टाटा समूहाचे नावे आघाडीवर होते. मात्र, आता हा करार होणार नसल्याचे कळते.

दरम्यान, बिस्लेरी ही बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायातील सध्याच्या काळातील आघाडीची कंपनी आहे. पण रमेश चौहान यांची मुलगी जयंती व्यवसायात लक्ष घालत नसल्याचे वडिलांनी कंपनी विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला. देशात बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ २० हजार कोटी रूपयांची असून त्यापैकी ६० टक्के हिस्सा असंघटित आहे, ज्यामध्ये बिसलरीचा वाटा ३२ टक्के आहे. अशा स्थितीत ही कंपनी टाटांनी झोळीत पडली असती तर बाजारातील टाटांचे वर्चस्व आणखी वाढू शकले असते, असे सांगितले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :टाटा