IT Sector Hiring : दबावाखाली असलेल्या आयटी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी टीसीएसनं (TCS) नव्या आर्थिक वर्षात ४२ हजार प्रशिक्षणार्थींची भरती करण्याची तयारी सुरू केली आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू करणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय. गेल्या आर्थिक वर्षात तेवढ्याच संख्येनं प्रशिक्षणार्थींची भरती करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं. यापूर्वी कंपनीने एप्रिलमधील वार्षिक वेतनवाढ तूर्तास थांबवल्यानं विद्यमान कर्मचाऱ्यांना मात्र मोठा धक्का बसलाय.
टीसीएसचे मुख्य एचआर अधिकारी मिलिंद लक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ मध्ये १.१ लाख कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. कंपनी चालू आर्थिक वर्ष २०२६ मध्ये सुमारे ४२,००० प्रशिक्षणार्थींची भरती करण्याच्या प्रक्रियेत आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्येही जवळपास तेवढ्याच संख्येनं भरती करण्यात आली होती. तर दुसरीकडे, "गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचा नफा कमी झाला आहे, तरीही आम्ही आमच्या भरती धोरणापासून मागे हटणार नाही," अशी प्रतिक्रिया टीसीएसचे सीएफओ समीर सेकसरिया यांनी दिली.
४० टक्के हायरिंग डिजिटल
गेल्या वर्षी आम्ही ४०% डिजिटल हायरिंग केली, तर मागील वर्षी हे प्रमाण १७% होते. आमच्यासाठी हा मोठा धोरणात्मक बदल आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी आपल्याला विकासाची आणि लोकांची गरज भासणार आहे आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी पदोन्नती हा एक चांगला मार्ग आहे. त्यामुळेच गेल्या आर्थिक वर्षात आम्ही १.१ लाख कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे, असंही लक्कड म्हणाले.
तीन श्रेणींमध्ये भरती
लक्कड यांच्या मते, टीसीएसचा नॅशनल क्वालिफायर टेस्ट एंट्री-लेव्हल भरतीसाठी एक इंटिग्रेटेड टेस्ट पॅटर्नचा अवलंब करतो. या टेस्टच्या कामगिरीच्या आधारे उमेदवारांना खालील तीन श्रेणींमध्ये एन्ट्री मिळू शकते– प्राइम, डिजिटल आणि निंजा. कंपनीनं आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ४२,००० प्रशिक्षणार्थींची भरती केली होती आणि चालू आर्थिक वर्षातही तितक्याच प्रशिक्षणार्थींची भरती करण्याची योजना आखत आहे.
निव्वळ नफा घसरला
टीसीएसच्या मार्च तिमाहीतील निव्वळ नफा १.७% घसरून १२,२२४ कोटी रुपये झाला आहे. यानंतर, कंपनीचे मुख्य एचआर अधिकारी मिलिंद लक्कड यांनी दरवर्षी एप्रिलमध्ये होणारा वेतनवाढ सध्या थांबवण्यात आली आहे आणि ती चालू आर्थिक वर्षात कधीही लागू केला जाऊ शकते, असं त्यांनी म्हटलं. हे पूर्णपणे व्यवसायाच्या कामगिरीवर अवलंबून असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तथापि, वेतनवाढ न झाल्याच्या परिस्थितीतही कंपनी ७०% कर्मचाऱ्यांना त्यांचा संपूर्ण व्हेरिएबल पगार देईल, तर उर्वरित ३०% कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर रक्कम दिली जाईल.