Join us  

गुजरातमध्ये सेमीकंडक्टर फॅक्ट्री उभारणार Tata Group, लिथियम आयन बॅटरी प्लांट उभारण्याचीही तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 2:38 PM

गुजरात ग्लोबल समिट दरम्यान अनेक उद्योगांनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय.

Vibrant Gujarat Global Summit: टाटा समूह  (Tata Group) गुजरातमधील धोलेरा येथे सेमीकंडक्टर फॅक्ट्री उभारणार आहे. याशिवाय लिथियम आयन बॅटरी बनवण्यासाठी साणंदमध्ये फॅक्ट्री सुरू करण्यात येणार आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर येथे सुरू असलेल्या १० व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट दरम्यान ही घोषणा करण्यात आली. 

टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की टाटा समूह गुजरातमधील धोलेरा येथे सेमीकंडक्टर फॅक्ट्री उभारणार आहे. याशिवाय, समूह दोन महिन्यांत साणंदमध्ये लिथियम आयन बॅटरी बनवण्यासाठी २० गीगाव्हॅट क्षमतेची गिगाफॅक्टरी सुरू करणार आहे. टाटा समूहानं एक संकल्प केला आणि तो आता पूर्ण होणार आहे, असं ते म्हणाले.

इतर ऑटोमोबाईल कंपन्यांप्रमाणे टाटा मोटर्सचेही लक्ष इलेक्ट्रिक वाहनांवर वाढत आहे. ईव्हीच्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी कंपनी पूर्णपणे तयार आहे. लिथियम-आयन बॅटरी प्लांटसाठी गुंतवणूक दोन टप्प्यांत होणार आहे, पुढील काही महिन्यांत यावर काम सुरू होईल. आर्थिक विकासाचा परिणाम सामाजिक विकासावरही झाला आहे. गुजरातनं स्वतःला भविष्याचे प्रवेशद्वार म्हणून स्पष्टपणं स्थान दिले असल्याचे एन चंद्रशेखरन म्हणाले. राज्यात समूहाची उपस्थिती वाढवण्यासाठी सुरू असलेल्या काही बाबींवरही त्यांनी प्रकाश टाकला.

फोर्डचं अधिग्रहण पूर्ण

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टाटा मोटर्सनं फोर्ड इंडियाच्या साणंद प्लांटचं 725.7 कोटी रुपयांना अधिग्रहण पूर्ण केलं होतं. यानंतर कंपनीचं साणंदमध्ये दोन प्लांट आहेत. फोर्डकडून खरेदी केलेल्या प्लांटला साणंद २ प्लांट असं नाव देण्यात आलंय. यामध्ये लवकरच इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती सुरू होईल. साणंद २ प्लांटमुळे, टाटा मोटर्सची उत्पादन क्षमता दरवर्षी ८५ हजार युनिट्सपर्यंत वाढेल.

टॅग्स :टाटागुजरातगुंतवणूक