टाटा ग्रूपच्या 'ताज' या प्रीमिअम हॉटेल ब्रँडनं जगातील मातब्बर कंपन्यांना मात दिली आहे. जगातील सर्वात मजबूत 'हॉटेल ब्रँड' म्हणून 'ताज हॉटेल्स'ला बहुमान मिळाला आहे. टाटा समूहाच्या हॉस्पिटॅलिटी अँड इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडनं (IHCL) याची माहिती दिली आहे. ब्रँड फायनान्सच्या 'हॉटेल्स-50 2021'च्या अहवालानुसार जगात महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटानंतरही सर्वोत्तम हॉटेल ब्रँडच्या यादीत 'ताज' अव्वल स्थानावर राहिलं. २०१६ साली पहिल्यांदाच 'ताज ब्रँड'चा सर्वोत्तम हॉटेल ब्रँड्सच्या क्रमवारीत समावेश झाला होता. त्यावेळी 'ताज'ला ३८ वं स्थान मिळालं होतं.
'टाटा' भारताची शान; गेल्या 100 वर्षांत केलं सर्वाधिक दान, जमशेदजी टाटा ठरले 'जगात भारी' परोपकारी!
जागतिक ब्रँड मूल्यांकन कन्सल्टंन्सी कंपनी ब्रँड फायनान्स विपणन गुंतवणूक, ग्राहक संवाद, कर्मचाऱ्यांचे समाधान आणि कॉरपोरेट प्रतिष्ठा अशा मानकांच्या आधारे ब्रँड किती मजबूत आहे हे निश्चित केलं जातं. "मानकांनुसार 'ताज' (ब्रँड मूल्य २९.६ कोटी डॉलर) १०० पैकी ८९.३ गुणांसह AAA ब्रँड रेटिंगसह जगातील सर्वात मजबूत हॉटेल ब्रँड ठरला आहे", असं कंपनीनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे. 'ताज'नंतर प्रीमिअर दुसऱ्या स्थानावर, मेलिना हॉटेल्स इंटरनॅशनल तिसऱ्या, एनएच हॉटेल ग्रूप चौथ्या आणि शांग्रीला हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स पाचव्या स्थानावर आहे.
गेल्या 100 वर्षांत केलं सर्वाधिक दान
टाटा समुहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गेल्या 100 वर्षांत सर्वाधिक दान करून जमशेदजी टाटा 'जगात भारी' परोपकारी ठरले आहेत. गेल्या 100 वर्षांच्या दानशूर लोकांच्या यादीत टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा (Jamsetji Tata) हे प्रथम स्थानी आहेत. हुरुन रिपोर्ट आणि एडेलगिव फाउंडेशनच्या वतीने दान करणाऱ्या ट़ॉप 50 लोकांची एक यादी तयार करण्यात आली आहे. जमशेदजी टाटा यांनी गेल्या 100 वर्षांत तब्बल 102 बिलियन डॉलर्सचं दान दिलं आहे. टाटा यांनी प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षणासाठी मोठे दान दिले आहे.