सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी आसाम सरकारने टाटा समूहासोबत करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या. यासाठी सरकारने कंपनीला मोरीगाव येथे १७० एकर जमीन ६० वर्षांच्या भाडेपट्टीने दिली आहे. या प्रकल्पासाठी टाटा समूह २७ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२५ च्या मध्यापर्यंत कार्यरत होणार आहे. प्रकल्पातून ३० हजार जणांना रोजगार दिले जातील.
या करारावर टाटा समूहाच्या वतीने बोर्डाचे सदस्य रंजन बंडोपाध्याय आणि आसाम औद्योगिक विकास महामंडळाचे तांत्रिक व्यवस्थापक आणि प्रकल्प प्रभारी धीरज पेगू यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी कानिनिका ठाकूर, अविनाश मिश्रा आणि अविनाश दाबाडे यांच्यासह टाटा समूहाचे अधिकारी उपस्थित होते.
हा प्रकल्प बंद पडलेल्या हिंदुस्थान पेपर कॉर्पोरेशन लि. च्या जागेवर उभा राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ मार्च रोजी टेलिकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रकल्पाची पायाभरणी केली. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आधी सांगितले होते की, आसामच्या सेमीकंडक्टर प्रकल्पातून २०२५ पर्यंत पहिली चीप बाहेर पडेल.