ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - भारतातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने भन्नाट आयडिया आणली असून सर्व पदं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीत टीमवर्कला वाव मिळावा तसंच कर्मचा-यांना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कंपनीत सर्वजण एकाच स्तरावर येणार आहेत. कंपनीत कोणीह बॉस नसेल आणि सर्वजण कर्मचारी म्हणूनच ओळखले जातील. टाटा मोटर्सकडून जनरल मॅनेजर, सीनिअर जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर. प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट ही पदं बरखास्त करण्यात येणार आहेत.
कंपनीने यासंबंधी एक परिपत्रक जारी केलं आहे. या निर्णयामुळे पद आणि पदानुक्रमाचा विचार न करता काम करण्याची संधी मिळेल असं कंपनीने म्हटलं आहे. वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 10 हजार कर्मचा-यांना हा निर्णय लागू होणार आहे.
कंपनीतील प्रत्येक टीमच्या प्रमुखाला "हेड" असं पद देण्यात येईल. आणि त्यापुढे त्या व्यक्तीचं नाव आणि कामाचा किंवा डिपोर्टमेंटचा उल्लेख असेल. तसंच जे कर्मचारी स्वतंत्र आहेत, कोणत्याही टीमचा भाग नाहीत त्यांचं नाव आणि विभागाचं नाव असेल.
भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात अशा प्रकारचा निर्णय घेणारी टाटा मोटर्स पहिलीच कंपनी असणार आहे. या निर्णयामुळे आतापर्यंत असलेल्या 14 पदांची संख्या पाचवर येईल. यामुळे ग्लोबल कंपन्या खासकरुन सर्व्हिस एजन्सींमध्ये असणारी कामाची संस्कृती आपल्याकडे रुजू होण्यास मदत होईल अशी अपेक्षा टाटा मोटर्सने व्यक्त केली आहे.
कर्माचारी आता आपल्या पदावर लक्ष केंद्रीत न करता कामावर संपुर्ण लक्ष देतील असा विश्वास टाटा मोटर्सला आहे. तसंच यामुळे कंपनीत वाद निर्माण करणारी प्रमोशनची प्रक्रियाही बंद होईल. कंपनीत कोणतीही प्रमोशन होणार नाहीत. आणि झालीच तर ती कंपनीत नोकरी उपलब्ध असल्यास होईल असंही सांगण्यात आलं आहे. कंपनीच्या या निर्णयावर कर्मचा-यांकडून संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. तरुण कर्मचा-यांमध्ये या निर्णयामुळे जास्त आनंद असल्याचं दिसत आहे.