नवी दिल्ली : सरकारी मालकीची प्रवासी विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाची खरेदी करण्यास टाटा उद्योग समूह इच्छुक आहे, असे प्रतिपादन समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी केले. टाटाला आपल्या हवाई व्यवसायाचा आकार वाढवायचा आहे, असे चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया सरकारने एकदा निश्चित केली की, आम्ही या प्रकरणात नक्की लक्ष घालू. टाटा समूहाची दोन छोट्या विमान वाहतूक कंपन्यांत भागीदारी आहे. एक भागीदारी सिंगापूर एअरलाइन्समध्ये, तर दुसरी मलेशियाच्या एअर एशिया बीएचडीमध्ये आहे. आम्हाला या क्षेत्रातील आमचा आकार वाढवायचा आहे. आमच्याकडे दोन एअर लाइन्स असल्या, तरी दोन्हीही छोट्या आकाराच्या आहेत. मला वाटते, आकार महत्त्वाचा आहे.
चंद्रशेखरन यांनी सांगितले की, एअर इंडियाच्या खासगीकरणात आम्ही जरूर लक्ष घालूत. तथापि, एअर इंडियाची विक्री कशा पद्धतीने होणार आहे, याबाबत अजून काहीच स्पष्टता झालेली नाही. एअर इंडिया ही संपूर्ण कंपनी विकणार की, त्याचे काही अंश विकणार, हे सरकारने स्पष्ट केलेले नाही. कंपनीवर ८.५ अब्ज डॉलरचे कर्ज आहे. त्याचे काय करणार, याबाबतही सरकारने काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. सर्व तपशील आम्हाला अजून मिळालेला नाही. एअर इंडियाच्या खरेदीबाबत आपण सिंगापूर एअर लाइन्सशी बोलला आहात का, या प्रश्नावर चंद्रशेखरन म्हणाले की, मी बोललो नसेल, असे आपणास वाटते का?
प्रथमच वाच्यता-
एअर इंडियात टाटाला रस आहे, याबाबतची वृत्ते या आधी आली होती. तथापि, चंद्रशेखरन यांनी त्याबाबत जाहीर वाच्यता केली नव्हती. याबाबत ते पहिल्यांदाच बोलले आहेत. गेल्या जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने एअर इंडियाच्या विक्रीस हिरवा कंदील दिला होता. एअर इंडिया २0१२ पासून तोट्यात असून, केवळ सरकारी मदतीवर सुरू आहे. कंपनीला आतापर्यंत ३.६ अब्ज डॉलरची मदत सरकारकडून मिळाली आहे.
एअर इंडियाच्या खरेदीस टाटा उद्योग समूह इच्छुक, चंद्रशेखरन यांचे प्रतिपादन; विमान व्यवसाय वाढविण्याची तयारी
सरकारी मालकीची प्रवासी विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाची खरेदी करण्यास टाटा उद्योग समूह इच्छुक आहे, असे प्रतिपादन समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी केले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:18 AM2017-10-12T01:18:35+5:302017-10-12T01:18:50+5:30