मीठापासून ते विमान कंपनीपर्यंत सारे काही उत्पादित करणारी टाटा ग्रुप आता आयफोन बनविण्याची तयारी करू लागला आहे. लवकरच टाटा मेड आयफोन भारतीयांच्या हातात पडण्याची शक्यता आहे. टाटा तैवानच्या सप्लायरसोबत चर्चा करत असून ती यशस्वी झाल्यास उद्योगविश्वासाठी तो एक मैलाचा दगड ठरणार आहे.
टाटा समूह भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी सहकार्य करण्यासाठी Apple च्या तैवानच्या पुरवठादाराशी चर्चा करत आहे. टाटा समूहाला भारतात आयफोन असेंबल करायचे आहेत. यासाठी विस्ट्रॉन कॉर्प (Wistron Corp.) सोबत चर्चा सुरु झाली आहे. टाटा कंपनीला टेक्नोलॉजी मैन्युफैक्चरिंगमध्ये पुढे यायचे आहे. यासाठी टाटा तैवानच्या कंपनीच्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि सप्लाय चेनचा देखील वापर करण्यास इच्छुक आहे.
ही चर्चा यशस्वी झाली तर टाटा आयफोन बनवणारा पहिला भारतीय उद्योग समूह बनेल. आयफोन सध्या तैवानची उत्पादक कंपनी विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीद्वारे असेंबल केले जातात. या कंपन्या चीन आणि भारतात आयफोन असेंबल करत आहेत. या क्षेत्रात टाटा उतरत असल्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणातही फायदे आहेत. भारतीय कंपनीकडून आयफोन बनवणे हे चीनला आव्हान देण्याच्या प्रयत्नांसाठी मोठी ताकद ठरणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात चीनचे वर्चस्व आहे. पण कोरोना आणि अमेरिकेशी घेतलेला पंगा यामुळे या वर्चस्वाला तडा जाऊ लागला आहे. जगातील अनेक मोठे इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड चीनवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी सध्या भारताकडे मोर्चा वळवत आहेत.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कराराची रचना आणि तपशील अद्याप निश्चित झालेले नाहीत. या गोष्टीशी संबंधीत लोकांनी टाटा विस्ट्रॉनच्या भारतीय ऑपरेशन्समध्ये भागभांडवल खरेदी करू शकते. याशिवाय दोन्ही कंपन्या मिळून नवीन असेंब्ली प्लांटही उभारू शकतात, असे सांगितले आहे. अॅपल ही अशी कंपनी आहे, जी स्थानिक कंपन्यांना हाताशी धरून आपले उत्पादन करते. यामुळे अॅपलला या चर्चेही माहिती आहे की नाही याची माहिती समोर आलेली नाही. आयफोन असेंबल करणे हे एक क्लिष्ट काम आहे. यासाठी वेळ आणि गुणवत्ता आदींची काळजी घ्यावी लागते.