ऑटो क्षेत्रातील दिग्गज टाटा मोटर्सनं लॉजिस्टिक्स स्टार्टअप फ्रेट टायगरमध्ये २६.७९ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. टाटा मोटर्सने या SaaS प्लॅटफॉर्ममध्ये सुमारे २७ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी १८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे १५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. यासह, कंपनीचं मूल्यांकन ६७ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे ५६० कोटी रुपये झालं आहे. या करारानुसार, टाटा मोटर्स पुढील दोन वर्षांत या स्टार्टअपमध्ये अतिरिक्त १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
दोन्ही कंपन्यांमध्ये सिक्युरिटीज सबस्क्रिप्शन करार (SSA) झाला आहे आणि शेअरहोल्डर्स अॅग्रीमेंटवर स्वाक्षरी करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत सुमारे २७ टक्के हिस्सा घेण्यात आला असल्याचं टाटा मोटर्सनं सांगितलं. टाटा मोटर्सच्या या धोरणात्मक अधिग्रहणामुळे कंपनीला त्यांची ट्रक आणि मालवाहतूक इकोसिस्टम आणखी सुधारण्यास मदत होईल.
Freight Tiger चं म्हणणं काय?Freight Tiger चे को-फाऊंडर आणि सीईओ स्वप्निल शाह यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. टाटा मोटर्स एक रणनितीक गुंतवणूक म्हणून सोबत आल्यानं आम्ही आनंदी आहोत. युनिफाईड नॅशनल प्लॅटफॅार्म बनवला जावा असं दोघांचंही व्हिजन आणि विश्वास आहे, असं ते म्हणाले. दिग्गज आणि अनुभवी पार्टनर्समुळे कंपनीला ती ताकद मिळत आहे, यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करण्यास मदत होईल असंही त्यांनी नमूद केलं. Freight Tiger ची सुरुवात २०१४ मध्ये स्वप्निल शाह यांनी केली होती. हे स्टार्टअप एक मार्केटप्लेस आहे जे फ्रेट फॉरवर्डर्स, वाहन मालक आणि लॉजिस्टिक सेवा प्रदाते यांना जोडते. हे स्टार्टअप सर्व मालवाहतुकीसाठी एंड-टू-एंड लॉजिस्टिक व्हॅल्यू चेन सोल्यूशन्स प्रदान करते.