मुंबई: कार खरेदी करण्याची प्रक्रिया बरीच मोठी असते. आधी कार्सची तुलना करायची, मग शोरूममध्ये जाऊन कार पाहायच्या. ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात साधारणत: दोन तीन वीकेंड खर्ची पडतात. मात्र आता कार खरेदी खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याइतकी सोपी होणार आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांमध्ये कार खरेदी करता येणार आहे. त्यासाठी टाटा मोटर्सनं जोरदार तयारी सुरू केली आहे.
टाटा समूहानं काही दिवसांपूर्वीच Tata Neu ऍप लॉन्च केलं. आता याच ऍपच्या माध्यमातून ग्राहकांना कारदेखील करता येतील. त्यासाठीची तयारी टाटा मोटर्सनं पूर्ण केली आहे. प्रवासी कार्सची माहिती नव्या ऍपसोबत इंटिग्रेट करण्याचं काम टाटाकडून सुरू आहे. Tata Neu ची मालकी टाटा डिजिटलकडे आहे. टाटा समूहाच्या इतर ब्रँडप्रमाणेच टाटा मोटर्सला Neu प्लॅटफॉर्मवर आणण्याची तयारी सुरू असल्याचं टाटा डिजिटलचे सीईओ प्रतिक पाल यांनी सांगितलं.
टाटा समूहानं ७ एप्रिलला Tata Neu ऍप लॉन्च केलं. दैनंदिन जीवनातील गरजेच्या जवळपास सगळ्याच वस्तू आणि सेवा या ऍपमध्ये आहेत. विविध क्षेत्रांत असलेल्या टाटा समूहाच्या सगळ्याच कंपन्यांची उत्पादनं आणि सेवा एकाच ऍपमध्ये उपलब्ध आहेत. औषधं, धान्यपासून विमान तिकीट बुक करण्याची सोय ऍपमध्ये आहे.