Tata Motors Price Hike : नवीन वर्षात तुमचं कार घेण्याचं स्वप्न आता अधिक महाग होणार आहे. कारण, मारुती सुझुकी, ह्युंदाईसह अनेक ऑटो कंपन्यांनी १ जानेवारीपासून प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. यात आता आणखी एका कंपनीचा समावेश झाला आहे. देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सकडून कार खरेदी करणे पुढील वर्षापासून महाग होणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून प्रवासी वाहनांच्या किमती ३ टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याची माहिती कंपनीने जाहीर केली आहे. एकीकडे कर्जाचे व्याजदर वाढत आहे, अशा परिस्थितीत आता कार घेणे सामान्यांसाठी अजून अवघड होणार आहे.
टाटा मोटर्स का वाढवतंय किंमत?कंपनीने निवेदनात म्हटले आहे की कच्च्या मालाच्या किमती आणि महागाई वाढीचा परिणाम अंशतः कमी करण्यासाठी वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे. मॉडेल आणि त्यांच्या प्रकारांवर किमतीत बदल होणार आहेत. टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या ताफ्यात Tiago, Tigor, Punch, Nexan, Curve, Harrier, Safari आणि इतर मॉडेल्सची विस्तृत कॅटेगरी आहे.
मारुती, ह्युंदाईसह अनेक कंपन्यांनी वाढवली किंमतयाआधी, मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा अँड महिंद्रा आणि जेएसडब्ल्यू एमजी मोटरसह अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनीही पुढील महिन्यापासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी, लक्झरी वाहन उत्पादक मर्सिडीज-बेंझ इंडिया, ऑडी आणि बीएमडब्ल्यू यांनी देखील खर्च आणि ऑपरेटिंग खर्चात वाढ झाल्याचे कारण देत जानेवारीपासून किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.
किया इंडियाची वाहनही महागकिया इंडियाने सोमवारी आपल्या सर्व वाहनांच्या किमती जानेवारीपासून २ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली. मोटार वाहन निर्मात्याने निवेदनात म्हटले आहे की, '१ जानेवारी २०२५ पासून वाढलेल्या किमती प्रामुख्याने वस्तूंच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीशी संबंधित खर्चात वाढ झाल्यामुळे आहेत. किया इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री आणि विपणन) हरदीप सिंग ब्रार म्हणाले की, कंपनी ग्राहकांना उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाने सुसज्ज प्रगत वाहने देण्यासाठी वचनबद्ध आहे. मात्र, वस्तूंच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे आता दरात बदल करणे आवश्यक झाले आहे.