लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : टाटा मोटर्सने विविध व्यवस्थापकीय (मॅनेजर) पदांवर काम करणाऱ्या १,५00 जणांना कामावरून काढले आहे. कंपनीने पत्रकारांना अधिकृतरीत्या ही माहिती दिली. संघटनात्मक पुनर्रचना प्रक्रियेचा भाग म्हणून ही नोकरकपात करण्यात आल्याचे कंपनीने सांगितलेटाटा मोटर्सने २0१६-१७ या वित्त वर्षाच्या कामगिरीचा आढावा जाहीर केला. त्यानिमित्त कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ग्युएंटर बट्श्चेक यांनी पत्रकारांशी बातचीत केली. त्याप्रसंगी त्यांनी सांगितले की, आमच्या व्यवस्थापकीय पातळीवरील १३ हजार संख्याबळापैकी १0 ते १२ टक्के (सुमारे १,५00) संख्याबळात कपात केली आहे. गेल्या काही महिन्यांत देशाच्या औद्योगिक क्षेत्रात नोकरकपातीचे वारे वाहत आहे. विशेष म्हणजे, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वृद्धिंगत होत असताना रोजगार कपात केली जात आहे. त्यामुळे भारताची आर्थिक वृद्धी ‘रोजगारविरहित’ असल्याचे बोलले जात आहे. लार्सन अँड टुब्रोने २0१७ च्या पहिल्या सहामाहीत १४ हजारांची नोकर कपात केली जाणार आहे. एचडीएफसी बँकेकडून याच काळात १0 हजार लोकांना कामावरून काढून टाकले जाणार आहे. आयटी क्षेत्रात किमान ५0 हजार लोकांना काढले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.टाटा मोटर्सच्या नोकर कपातीचा फटका ब्ल्यू कॉलर कामगार वर्गाला बसणार नाही, पांढरपेशा नोकरदारांची संख्याच फक्त कमी केली जात आहे, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. १४ टप्प्यांतील व्यवस्थापकीय यंत्रणा फक्त ५ टप्प्यांची करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यात तब्बल ९ श्रेणींतील पदे रद्दच होत आहेत. त्यावर काम करणाऱ्या लोकांना घरी बसविण्यात येत आहे. टाटा मोटर्सचे मुख्य वित्त अधिकारी सी. रामकृष्णन यांनी सांगितले की, आम्ही गेल्या ६ ते ९ महिन्यांपासून व्यवस्थापकीय यंत्रणेच्या पुनर्रचनेवर काम करीत आहोत. आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्वामित्व आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली. खर्च कपात हा त्यामागील उद्देश नाही.
दीड हजार मॅनेजर्सना टाटा मोटर्सने दिले ‘नारळ’
By admin | Published: May 25, 2017 1:05 AM