Tata Motors Share price: टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी सकाळी कंपनीच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. गेल्या आठवड्यात कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाले. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १७,५२८.५९ कोटी रुपये होता. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर ३ पटीनं वाढ झाली आहे.
आज सकाळी कंपनीचा शेअर १०१०.३० रुपयांच्या पातळीवर उघडला. पण तो ८.६७ टक्क्यांनी घसरून ९५५.४० रुपयांवर आला. त्याचबरोबर टाटा मोटर्स लिमिटेडच्या (DVR) शेअर्समध्येही मोठी घसरण नोंदवण्यात आली. दिवसभरात तो ८.६८ टक्क्यांनी घसरून ६४५.५५ रुपयांवर आला. मार्च तिमाहीत शेअर बाजाराला चांगल्या निकालाची अपेक्षा होती.
कसा होता तिमाही निकाल?
आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत टाटा मोटर्सची एकत्रित वाढ ३ पटीनं वाढून १७,५२८.५९ कोटी रुपये झाली. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या (जानेवारी ते मार्च) तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ५,४९६.०४ कोटी रुपये होता. टाटा मोटर्सनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, या तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू १,१९,९८६.३१ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत १,०५,९३२.३५ कोटी रुपये होता.
३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ३१,८०६.७५ कोटी रुपये होता, जो मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २,६८९.८७ कोटी रुपये होता. एकत्रित महसूल मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील ३,४५,९६६.९७ कोटी रुपयांवरून वाढून ४,३७,९२७.७७ कोटी रुपये झाला आहे.
तिमाही निकालाबाबत काय म्हणाली कंपनी?
कंपनीच्या म्हणण्यानुसार, चौथ्या तिमाहीत तिन्ही वाहन व्यवसायांनी दमदार कामगिरी केली. कंपनीच्या ब्रिटिश युनिट जग्वार लँड रोव्हरनं आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी केली. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत महसूल ११ टक्क्यांनी वाढून ७.९ अब्ज पौंड झाला आहे.
लाभांशही जाहीर
संचालक मंडळानं शेअरधारकांच्या मान्यतेच्या अधीन राहून प्रति सर्वसाधारण शेअर ३ रुपये आणि 'ए' सर्वसाधारण शेअरमागे ३.१० विशेष लाभांश देण्याची शिफारस केली आहे.
(टीप - यात केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)