Tata Motors :मारुती सुझुकी कंपनीनंतर आता टाटानेही आपल्या ग्राहकांना धक्का देणार आहे. देशातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने १ एप्रिल २०२५ पासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. वाढत्या खर्चामुळे हे पाऊल उचलणे गरजेचे झाले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ऑटोमोबाईल उद्योगातील कच्च्या मालाच्या किंमती सतत वाढत आहेत, ज्यामुळे कंपनीच्या खर्चावर परिणाम होत आहे. टाटा मोटर्स त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती २% पर्यंत वाढवणार आहेत. ही वाढ वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंटनुसार बदलते. यापूर्वी मारुतीनेही एप्रिलपासून आपल्या वाहनांच्या किमती ४ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली होती.
मारुतीनेही किंमत वाढवलीयाआधी, भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने देखील एप्रिल २०२५ पासून आपल्या सर्व वाहनांच्या किमती ४% पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. यामागे कंपनीने अनेक कारणे दिली आहेत. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वाहतूक खर्च आणि वाढती महागाई यामुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे. कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही चढ-उतार होत आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ सर्व मॉडेल्सना लागू होईल. कंपनीचे म्हणणे आहे की ग्राहकांवर कमीत कमी बोजा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे पण वाढत्या खर्चामुळे किमती वाढवणे आवश्यक झाले आहे.
टेस्लामुळे टाटा-महिंद्राला धक्का बसणार?इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनीची इलेक्ट्रीक कार लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. यासंबंधी सर्व प्रक्रिया पार पडल्याची माहिती समोर आली आहे. सध्या टेस्ला कंपनीच्या कारवर भारत ११० टक्के आयात शुल्क आकारत आहे. उद्या हा शुल्क १० ते २० टक्क्यांपर्यंत आला. तर याचा विपरित परिणाम टाटा, महिंद्रा सारख्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात बसणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.