Join us  

एअर इंडियाच्या महाराजाला ‘टाटां’चा टाटा; बोधचिन्ह बदलण्याचे संकेत, एअर इंडियाचा होणार कायाकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 5:47 AM

१९४६ पासून जनमानसांत लोकप्रिय असलेले हे बोधचिन्ह बदलण्याची तयारी एअर इंडियाने केली असून ऑगस्टमध्ये नवे बोधचिन्ह सादर केले जाणार आहे. 

मुंबई : ओठांवर भरदार मिशा, डोईवर आकर्षक फेटा आणि वर्तनात अदब... असे सुखद चित्र दर्शवत प्रवाशांना आश्वस्त करणारे एअर इंडियाचे ‘महाराजा’ हे बोधचिन्ह लवकरच आता इतिहासजमा होण्याचे संकेत आहेत. १९४६ पासून जनमानसांत लोकप्रिय असलेले हे बोधचिन्ह बदलण्याची तयारी एअर इंडियाने केली असून ऑगस्टमध्ये नवे बोधचिन्ह सादर केले जाणार आहे. 

एअर इंडियाचे तत्कालीन संचालक बॉबी कुक्स यांनी कंपनीसाठी महाराजा या बोधचिन्हाची निर्मिती केली होती. त्यानंतर कंपनीच्या सर्व विमानांवर, लाउंजमध्ये अनेक ठिकाणी महाराजा प्रवाशांना दिसत होता. एअर इंडियाचे नाव काढले तरी अनेकांना आज महाराजा आठवतो. मात्र, एअर इंडिया कंपनी गेल्या जानेवारीमध्ये टाटा समूहाने विकत घेतली. त्यानंतर कंपनीने आपल्या विमान सेवेचा कायाकल्प सुरू केला आहे. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून महाराजा हे बोधचिन्ह आता बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. 

दरम्यान, जानेवारीमध्ये एअर इंडियाचा ताबा टाटा समूहाने घेतल्यानंतर आता कंपनीच्या एअर एशिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि विस्तारा या तीनही कंपन्या एअर इंडिया या मुख्य कंपनीत विलीन करत एकच मोठी कंपनी व मोठा विमान ताफा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. अद्ययावत विमाने तसेच आरामदायी प्रवासासाठी उत्तम अंतर्गत सजावट करण्याचे कामही कंपनीने सुरू केले आहे.

लंडनस्थित कंपनी करणार नवे बोधचिन्ह

कंपनीचे नवे बोधचिन्ह तयार करण्याचे काम लंडनस्थित एका कंपनीला दिल्याची माहिती आहे. हे नवे बोधचिन्ह येत्या ऑगस्टमध्ये सादर होण्याची शक्यता असून कंपनी पूर्णपणे नव्याने आपल्या विमान सेवेचे ब्रँडिग करणार आहे.

टॅग्स :एअर इंडियाटाटा