Join us

टाटा पॉवरचा राज्य सरकारसोबत करार, १३००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार; पुणे, भिवपुरीत प्रकल्प उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 1:14 PM

विकसित करणार २८०० मेगावॅट क्षमतेचे पम्प्ड हायड्रो स्टोरेज प्रोजेक्ट्स, रोजगार निर्मितीही होणार.

देशातील बड्या वीज कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा पॉवरनं महाराष्ट्र राज्य सरकारसोबत दोन मोठे पम्प्ड हायड्रो स्टोरेज प्रकल्प (पीएसपी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.  राज्यात उभारल्या जाणार असलेल्या या दोन प्रकल्पांची एकूण क्षमता २८०० मेगावॅट असेल. तसंच दोन्ही प्रकल्पांमध्ये मिळून जवळपास १३००० कोटी रुपयांची गुंतवणूक होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या कराराबाबत टाटा पॉवरनं शेअर केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 'पंप हायड्रो स्टोरेज प्रोजेक्ट्स'शी (PSP) संबंधित दोन प्रकल्पांमध्ये १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. पुण्यातील शिरवता आणि रायगडमधील भिवपुरी येथे हे २८०० मेगावॅट क्षमतेचा पम्प्ड हायड्रो स्टोरेज प्रकल्प उभारले जाणार आहेत. पुणे प्रकल्पाची क्षमता १,८०० मेगावॅट असेल, तर रायगड प्रकल्पाची क्षमता १,०० मेगावॅट असेल.

६ हजार रोजगार मिळण्याची शक्यताटाटा समूहाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंप्ड हायड्रो स्टोरेज प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सरकार आणि टाटा पॉवर यांच्यातील हा करार खूप फायदेशीर ठरणार आहे. हे सहकार्य राज्याला २०२८ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. यासोबतच या दोन्ही प्रकल्पांमुळे लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. प्रकल्प सुरू झाल्यानंतर ६ हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळू शकेल, अशी अपेक्षा कंपनीकडून व्यक्त करण्यात आलीये.

काय करते कंपनी?टाटा पॉवर ही समूहाची इंटिग्रेटेड पॉवर कंपनी आहे. ही इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन, इलेक्ट्रॉनिक उत्पादनं आणि सेवा व्यवसायात कार्यरत आहे. टाटा समूहाची ही कंपनी गेल्या शतकाहून अधिक काळ राज्यात जलविद्युत प्रकल्प चालवत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

टॅग्स :टाटादेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र