Join us  

'टाटा'ची एअरलाईन कंपनी Vistara नं उड्डाणांची संख्या केली कमी, रद्दही होतायत; जाणून घ्या प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 9:16 AM

Vistara Flight delays: टाटा समूहाची (Tata Group) कंपनी विस्तारानं (Vistara) आपल्या उड्डाणांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Vistara Flight delays: टाटा समूहाची (Tata Group) कंपनी विस्तारानं (Vistara) आपल्या उड्डाणांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आला आहे. दरम्यान, सध्या विस्ताराची अनेक उड्डाणं एक तर रद्द होत आहेत किंवा उड्डाणांसाठी विलंब होत आहे. यानंतर कंपनीनं उड्डाणांची संख्या तात्पुरता कमी करण्याचा निर्णय घेतलाय. 

काय म्हटलं विस्तारानं? 

टाटा ग्रुप आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या विस्तारा एअरलाइन्सचे प्रवासी फ्लाइट रद्द होण्याबाबत आणि विमानांना उशिर होत असल्याबद्दल सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. कंपनीनंही सोमवारी हे मान्य केलं. "गेल्या काही दिवसांत क्रूच्या अनुपलब्धतेसह विविध ऑपरेशनल कारणांमुळे उड्डाणं रद्द करण्याच्या आणि विलंबाच्या अनेक घटना घडल्या आहेत. आम्ही आमच्या नेटवर्कवर पुरेशी कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी फ्लाइट्सची संख्या तात्पुरती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे," असं कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं. 

ड्रीमलायनर सेवा 

देशांतर्गत काही निवडक मार्गांवर B787-9 ड्रीमलाइनर आणि A321neo सारखी वाइडबॉडी विमानांच्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एकाच फ्लाइटमध्ये अधिक प्रवासी बसण्यास मदत होईल, असं प्रवक्त्यानं सांगितलं. विमान रद्द आणि विलंबामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीनं खेदही व्यक्त केला आहे. या गैरसोयीचा सामना करण्यासाठी, कंपनी ग्राहकांना पर्यायी फ्लाइटचा पर्याय देत आहे किंवा त्यांना नियमानुसार परतावा दिला जात आहे. 

का झालं असं? 

सध्या विस्ताराला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागत आहे. उड्डाणांना होणारा उशिर किंवा उड्डाणं रद्द झाल्यामुळे प्रवासी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करत आहेत. अनेक प्रवाशांनी गेल्या काही दिवसांमध्ये फ्लाइटला ५ तासांपर्यंत विलंब झाल्याची तक्रार केली. तर काही प्रवाशांनी फ्लाइट रद्द करूनही पूर्ण रिफंड दिला जात नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

टॅग्स :टाटाव्यवसाय