Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटा सन्सचा मिस्त्रींवर विश्वासघाताचा आरोप

टाटा सन्सचा मिस्त्रींवर विश्वासघाताचा आरोप

देशातील सर्वांत मोठ्या टाटा उद्योग समूहाचे नियंत्रण करणाऱ्या टाटा सन्स या कंपनीने चेअरमन पदावरून दूर करण्यात आलेल्या सायरस मिस्त्रींवर गुरुवारी विश्वासघाताचा थेट

By admin | Published: November 11, 2016 04:28 AM2016-11-11T04:28:06+5:302016-11-11T04:28:06+5:30

देशातील सर्वांत मोठ्या टाटा उद्योग समूहाचे नियंत्रण करणाऱ्या टाटा सन्स या कंपनीने चेअरमन पदावरून दूर करण्यात आलेल्या सायरस मिस्त्रींवर गुरुवारी विश्वासघाताचा थेट

Tata Sons accused of mistreatment of Mistry | टाटा सन्सचा मिस्त्रींवर विश्वासघाताचा आरोप

टाटा सन्सचा मिस्त्रींवर विश्वासघाताचा आरोप

मुंबई : देशातील सर्वांत मोठ्या टाटा उद्योग समूहाचे नियंत्रण करणाऱ्या टाटा सन्स या कंपनीने चेअरमन पदावरून दूर करण्यात आलेल्या सायरस मिस्त्रींवर गुरुवारी विश्वासघाताचा थेट आरोप केला आणि समूहातील सर्व कंपन्यांमधून मिस्त्री यांना दूर करण्याचा आपला इरादा जाहीर केला.
चेअरमनपदावरून दूर केल्याच्या दुसऱ्या दिवशी मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या संचालकांना ई-मेलने एक पत्र पाठवून आपल्यावर कसा अन्याय झाला याचा पाढा वाचण्याखेरीज आता अंतरिम चेअरमन नेमलेले माजी चेअरमन रतन टाटा यांच्यावरही व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप केले होते. टाटा सन्सने गुरुवारी नऊ पानांचे एक निवेदन प्रसिद्ध करून मिस्त्री यांच्या पत्रातील प्रत्येक आरोपाचे सविस्तरपणे खंडन केले. टाटा सन्स या निवेदनात म्हणते की, समूहातील सर्व कंपन्यांवर फक्त आपलेच वर्चस्व राहावे यासाठी मिस्त्री यांनी गेल्या चार वर्षांत पद्धतशीरपणे योजना ठरवून ती राबविली. मिस्त्रींच्या काळात समूहाची १०० वर्षांहून अधिक काळापासूनची रचना जाणीवपूर्वक मोडून काढली गेली. परिणामी, समूहातील कंपन्या मूळ प्रवर्तक व भागधारकांकडून दूर नेल्या गेल्या. यामुळे चेअरमन हेच समूहातील अनेक कंपन्यांवर एकमेव सामायिक संचालक राहतील, अशी नवी अस्वीकारार्ह रचना प्रस्थापित झाली. हे असेच सुरू राहू दिले जाऊ शकत नव्हते.
निवेदन म्हणते की, मागे वळून पाहता असे दिसते की, टाटा सन्स आणि टाटांच्या अन्य प्रतिनिधींना बाजूला करून समूहाच्या मुख्य कंपन्यांवर ताबा मिळविण्याच्या या इच्छेमुळे मिस्त्री यांनी त्यांना चार वर्षांपूर्वी ज्या विश्वासाने टाटा सन्सने चेअरमन नेमले होते त्याची प्रतारणा केली.
त्रयस्थ संचालकांना हाताशी धरून मिस्त्री यांनी समूहातील इंडियन हॉटेल्स ही कंपनी आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही करण्यात आला. मिस्त्री यांच्यावर अव्यवस्थापन व चुकीच्या निर्णयांचा ठपका ठेवताना निवेदनात म्हणण्यात आले की, मिस्त्री यांच्या चेअरमनपदाच्या कारकिर्दित समूहातील सुमारे ४० कंपन्यांच्या लाभांशात घट झाली व खर्च वाढला. टाटा स्टील युरोप, डोकोमो-टाटा टेले संयुक्त कंपनी आणि टाटा मोटर्सच्या भारतातील व्यवहारांमध्ये मिस्त्रींच्या काळात कोणतीही लक्षणीय सुधारणा झाली नाही. वाढता तोटा, वाढती कर्जे व बाजारपेठेतील घसरते स्थान यामुळे परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक खराब झाली. (विशेष प्रतिनिधी)

टीसीएसमधूनही मिस्त्रींना हटविले
देशातील सर्वांत मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीच्या चेअरमनपदावरून टाटा सन्सने मिस्त्री यांना दूर केले. त्यांच्या जागी इशात हुसैन यांची अंतरिम चेअरमन म्हणून नेमणूक केली. ‘टीसीएस’ ही टाटा उद्योग समूहातील सर्वांत मोठी व सर्वांत जास्त नफा कमावणारी कंपनी आहे. या कंपनीत टाटा सन्सचे ७३.२६ टक्के भागभांडवल आहे.
हुसैन यांची नेमणूक करण्यात आल्याचे टाटा सन्सने ९ नोव्हेंबरच्या पत्रान्वये कळविले आहे. हुसैन हे टाटा स्टील व व्होल्टास यांसह अनेक कंपन्यांचेही चेअरमन आहेत. अन्य कोणाची कायमस्वरूपी नेमणूक होईपर्यंत ते ‘टीसीएस’चे अंतरिम चेअरमन म्हणूनही काम पाहतील. या बदलावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्यासाठी कंपनीच्या भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभाही बोलाविण्यात आली आहे.

इंडियन हॉटेल्समधूनही गच्छंतीची नोटीस
टाटा उद्योग समूहाच्या हॉटेल व्यवसायाचे काम पाहणाऱ्या इंडियन हॉटेल्स कंपनीच्या चेअरमनपदावरूनही सायरस मिस्त्री यांना दूर करण्याच्या दिशेने टाटा सन्सने पाऊल टाकले आहे.
या कंपनीत टाटा सन्सचे फक्त २८ टक्के भागभांडवल असल्याने ते स्वत:हून मिस्त्रींना हटवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना संचालक पदावरून व पर्यायाने चेअरमन पदावरूनही दूर करण्याचा ठराव मंजूर करून घेण्यासाठी कंपनीच्या भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची नोटीस टाटा सन्सने कंपनीस पाठविली आहे.
काही दिवसांपूर्वी कंपनीच्या तिमाही हिशेबांना मंजुरी देण्यासाठी मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली होती. त्याआधी कंपनीच्या त्रयस्थ संचालकांनी मिस्त्री यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारे निवेदन प्रसिद्ध केले होते.

Web Title: Tata Sons accused of mistreatment of Mistry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.