N Chandrasekaran Tata Sons: एन. चंद्रशेखर यांची पुन्हा एकदा टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष (Executive Chairman) म्हणून नियुक्ती केली आहे. टाटा सन्सच्या (Tata Sons) संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये चंद्रशेखर यांचा कार्यकाळ ५ वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१७ मध्ये चंद्रशेखर यांची पहिल्यांदा टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा हा कार्यकाळ २० फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार होता.
टाटा समुहाच्या दोन डझनहून अधिक सूचीबद्ध कंपन्या आहेत. टीसीएस, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा केमिकल्स या समूहाच्या मोठ्या कंपन्या आहेत. टाटा सन्सचे अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते टाटा समूहातील कंपन्यांचेही प्रमुख आहे. कंपन्यांच्या व्यवसायात वाढ, रणनीती यासारख्या निर्णयांमध्ये अध्यक्षांचा मोठा वाटा असतो.
नेतृत्व संकटात असताना चंद्रशेखरन यांची नियुक्ती
समूह नेतृत्वाच्या संकटातून जात असताना एन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्षपदी पहिल्यांदा नियुक्ती करण्यात आली. कंपनीने सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून हटवले होते. त्याविरोधात मिस्त्री यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारला होता. त्यानंतर समूहाला संकटातून बाहेर काढण्यासाठी तसेच TCS, Tata Motors, Tata Steel सारख्या दिग्गज कंपन्यांच्या वाढीला चालना देण्याची जबाबदारी चंद्रशेखर यांच्यावर होती. या कामात ते शंभर टक्के यशस्वी झाले आहेत.
Tata Sons board renews N Chandrasekaran’s term as Executive Chairman for the next five years
— ANI (@ANI) February 11, 2022
(file photo) pic.twitter.com/txn1ZHuipV
मिस्त्री वादातूनही बाहेर
चंद्रशेखरन यांच्या पहिल्या कार्यकाळात टाटा समूहाने केवळ सायरस मिस्त्री वादावर मात केली नाही तर समूहातील अनेक कंपन्यांसाठी चांगली कामगिरी केली. चंद्रशेखर यांना टाटा समूहात ३४ वर्षांचा अनुभव आहे. आयआयएम-कलकत्ता येथून एमबीए केल्यानंतर त्यांनी १९८८ मध्ये टाटा स्टीलमध्ये नोकरी सुरू केली. २०१७ मध्ये जेव्हा ते समूहाचे कार्यकारी अध्यक्ष झाले तेव्हा ते TCS चे प्रमुख होते. विशेष म्हणजे, ते समूहाचे कार्यकारी अध्यक्ष बनणारे पहिले नॉन फॅमिली मेंबर होते.
पाच वर्षांत चांगली कामगिरी
गेल्या पाच वर्षांत, टाटा समूहाच्या प्रमुख कंपन्यांनी गुंतवणूकदारांचीही चांदी केली आहे. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली TCS ही देशातील सर्वात मोठी कंपनी बनण्यात यशस्वी झाली. बाजार भांडवलाच्या बाबतीत, ही कंपनी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमधील अंतर खूपच कमी आहे. याचे बरेचसे श्रेय चंद्रशेखरन यांना जाते. समूहातील दिग्गज TCS या कंपनीचे शेअर्स गेल्या पाच वर्षांत तिप्पट झाले आहेत. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी शेअरची किंमत १२०३ रुपये होती. सध्या या शेअरची किंमत ३७०६ रुपये आहे.