नवी दिल्ली: अलीकडेच Air Inida ची घरवापसी TATA समूहाकडे झाली आहे. मात्र, आधीच कर्जात आकंठ बुडालेल्या एअर इंडियाचे संचालन सोपे नाही. असे असले तरी टाटा कंपनी कंबर कसून तयारीला लागली आहे. टाटा आता एअर इंडियाला हायटेक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठी योजना आखली आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, टाटा समूह एअर इंडियाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करेल. एअर इंडियाची जवळपास सर्व विमाने अद्ययावत केली जातील. एअर इंडिया एअरलाइन्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञानाच्या बाबतीत सर्वांत हायटेक एअरलाइन बनवले जाईल, असा विश्वास एन. चंद्रशेखरन यांनी जगभरातील एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना डिजिटल पद्धतीने संबोधित करताना व्यक्त केला.
एअर इंडियाला पुन्हा सर्वोत्तम एअरलाइन बनवायचेय
एअर इंडियाला पुन्हा सर्वोत्तम बनवण्यासाठी कंपनीची पुनर्रचना केली जाईल. यासाठी मोठा बदल करणे आवश्यक आहे. कदाचित तो बदल सर्वांत मोठा ठरू शकेल. एअर इंडिया आपली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उंची आणखी वाढवेल. भारताला जगाच्या प्रत्येक भागाशी जोडण्याचा आमचा उद्देश आहे, असे एन. चंद्रशेखरन यांनी नमूद केले. याशिवाय, एअर इंडियामुळे १३० कोटी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी टाटा समूहाला मिळाली आहे. ताज हॉटेल्स, तनिष्क, टाटा सॉल्ट आणि जग्वार लँड रोव्हर यासह आमच्या विविध ब्रँडद्वारे आम्ही आधीच ६० कोटी भारतीयांच्या जीवनाचा एक भाग झालो आहोत, असे एन. चंद्रशेखर म्हणाले.
एअर इंडिया व्यवस्थापन चार भागांवर करणार लक्ष केंद्रित
टाटाने चार प्रमुख भाग निवडले आहेत, ज्यावर एअर इंडियाचे नवीन व्यवस्थापन लक्ष केंद्रित करेल. सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा, तांत्रिकदृष्ट्या हायटेक, आदरातिथ्य आणि आधुनिकीकरण, या चार भागांवर भर दिल्याने एअर इंडिया जगातील सर्वांत चांगली एअरलाइन्स बनू शकेल, असेही चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एअर इंडिया विमान ताफाच्या आधुनिकीकरणाबाबत बोलताना एन. चंद्रशेखरन म्हणाले की, आम्ही आमच्या ताफ्यात सुधारणा करणार आहोत. लवकरच एअर इंडियातील विमानाच्या ताफ्याचे आधुनिकीकरण करण्यात येईल. एअर इंडियामध्ये नवीन विमाने आणली जातील. आम्ही आमची रेंज वाढवू. केवळ लहान आणि मोठ्या आकाराच्या विमानांची संख्या वाढवणार नाही, तर आम्ही अनेक नवीन स्थळांसाठी उड्डाण सुरू करू. मात्र, त्यासाठी खूप काम करावे लागेल, असे चंद्रशेखन यांनी सांगितले.