Join us

“भारताला ३ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात TATA ग्रुप महत्त्वाची भूमिका बजावेल”

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 11:38 AM

एअर इंडियाची बोली यशस्वी ठरणे हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक क्षण होता, असे एन. चंद्रशेखरन यांनी नमूद केले.

नवी दिल्ली: TATA ग्रुप आताच्या घडीला अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. टाटा समूह जगातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा अनेकविध क्षेत्रात टाटा ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यातच आता भारताला तीन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात टाटा समूह महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी व्यक्त केला आहे. 

तब्बल १०० अब्ज अमेरिकी डॉलरच्या विविधांगी व्यवसाय स्वारस्य असलेल्या टाटा समूहाच्या आठ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या. नवीन कोरोना व्हेरिएंट ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाच्या उद्रेकाला प्रतिबंधासाठी समाज म्हणून आपण सर्वोत्तम तयारी करण्यासह, त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेणेही शिकले पाहिजे, असे आवाहन एन. चंद्रशेखर यांनी केले.

हा एक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक क्षण आहे

डिजिटल, नूतन ऊर्जा स्रोत, पुरवठा साखळीत लवचीकता आणि आरोग्य यांना टाटा समूहाच्या रणनीतीत येत्या काळात अग्रक्रम असेल. आपला समूह दीर्घ काळापासून आहे, त्यापेक्षा अधिक साधेपणा अंगीकारणारा आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत बनला आहे. कार्बन उत्सर्जनाच्या समस्येचे निराकरण करण्यात आणि त्यासंबंधाने क्रांतिकारक नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी टाटा समूहाच्या कंपन्यांनी चांगली प्रगती केली आहे. एअर इंडियाला जिंकण्याच्या यशस्वी बोलीसह आपण या वर्षांला निरोप दिला आणि हा एक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक क्षण आहे, असे एन. चंद्रशेखरन यांनी यावेळी नमूद म्हणाले.

भारताच्या उत्कर्षांत आपला समूह ठोस भूमिका बजावू शकतो

भारताच्या उत्कर्षांत आपला समूह ठोस भूमिका बजावू शकतो. २०२४ पर्यंत ३ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या महत्त्वाकांक्षेसह, आपण स्वत:ला अधिक सुलभ, अधिक टिकाऊ आणि तंत्रज्ञानदृष्ट्या अधिक प्रगत बनविण्याच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली पाहिजे. जर हे आपल्याला आणि कंपनीला शक्य बनले तर देशाला पुढचे पाऊल टाकण्यासही आपल्याला हातभार लावता येईल, असेही एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले. 

दरम्यान, टाटा समूहातील कुटुंबे आणि व्यक्तींना खूप मोठा त्रास सहन करावा लागला आहे. दुसऱ्या लाटेचा चरमबिंदू हा कठीण काळ असताना, टाटा समूहाने त्या आव्हानाला दिलेला प्रतिसाद, धैर्य आणि नि:स्वार्थीपणा दाखवला याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. आम्ही रुग्णालयांना जीवन वाचवणारा ऑक्सिजन पुरवला आणि आरोग्य सेवा क्षमता वाढवली जेणेकरून त्यांना आवश्यक उपचार मिळू शकतील. हा एक अतुलनीय प्रयत्न होता, आणि तुम्ही जे काही केले त्याबद्दल मी तुमच्यापैकी प्रत्येकाचे आणि तुमच्या कुटुंबाचे आभार मानू इच्छितो, असे एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :टाटारतन टाटाअर्थव्यवस्था