Join us  

टाटा सन्सवरूनही मिस्त्रींना हटविणार

By admin | Published: January 06, 2017 11:44 PM

सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या संचालकपदावरून हटविण्याची तयारी उद्योग समूहाने चालविली

नवी दिल्ली : सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या संचालकपदावरून हटविण्याची तयारी उद्योग समूहाने चालविली असून, त्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी भागधारकांची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. १0३ अब्ज डॉलर बाजारमूल्य असलेल्या टाटा उद्योग समूहाच्या चेअरमनपदावरून मिस्त्री यांना २४ आॅक्टोबर रोजी हाकलण्यात आले होते. तसेच टाटा मोटर्स आणि टीसीएस यांसारख्या कंपन्यांच्या संचालक मंडळांतून त्यांच्या हकालपट्टीची तयारी केली होती. त्यानंतर मिस्त्री यांनी टाटांच्या सहा आॅपरेटिंग कंपन्यांच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला होता. तथापि, त्याचवेळी त्यांनी टाटाचे हंगामी चेअरमन रतन टाटा यांच्या विरोधात राष्ट्रीय कंपनी लवादापुढे याचिकाही दाखल केल्या होत्या.२४ आॅक्टोबर रोजी टाटा सन्सने एक ठराव करून मिस्त्री यांना कंपनीच्या चेअरमनपदावरून हाकलले तथापि, ते कंपनीच्या संचालक मंडळात कायम होते. तेथून त्यांना हाकलण्यासाठी आता भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभेची तयारी करण्यात आली आहे. सभा बोलावण्यासाठी कंपनीने एक नोट जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की, पदावरून हाकलल्यानंतर मिस्त्री यांनी कंपनी आणि संचालक मंडळावर निरर्थक आरोप केले आहेत. त्यामुळे केवळ संचालक मंडळच नव्हे, तर कंपनीच्या विश्वासार्हतेलाच धक्का पोहोचला. कंपनीचा अंतर्गत पत्रव्यवहार त्यांनी उघड केला. त्यात अनेक गोपनीय दस्तावेज होते. मिस्त्री यांच्या वर्तनामुळे कंपनीची मोठी हानी झाली आहे. कंपनीचे भागधारक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>टाटा सन्सने जारी केलेल्या नोटमध्ये पुढे म्हटले की, मिस्त्री यांनी गोपनीय दस्तावेज उघड केल्यामुळे कंपनीची बाजारातील स्थिती कमजोर झाली. त्यामुळे टाटा सन्सला नुकसान सोसावे लागले. अप्रत्यक्षरित्या हे नुकसान समभागधारकांचेच आहे. अशा परिस्थितीत मिस्त्री यांचे कंपनीच्या संचालक मंडळावर कायम राहणे कुठल्याही परिस्थितीत योग्य नाही.