- ऋषी दर्डा
सरकारी विमान कंपनी एअर इंडिया (Air India) आता पुन्हा टाटा समूहाच्या (TATA Group) ताब्यात जाणार आहे. एअर इंडियाच्या खासगीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या मंत्रिगटानं टाटा समूहाची निवड केली आहे. एअर इंडियासाठी टाटा समूह (TATA Group) आणि स्पाईसजेटच्या (Spicejet) अजय सिंग यांनी बोली लावली होती. पैकी सर्वाधिक बोली टाटा समूहानं लावली. डिसेंबरपर्यंत टाटा समूहाला एअर इंडियाचा मालकी हक्क मिळू शकतो.
इतिहासाचं एक वर्तुळ पूर्णएअर इंडिया टाटांच्या ताब्यात जात असल्यानं एक वर्तुळ पूर्ण होणार आहे. एअर इंडियाची स्थापना उद्योगपती जेआरडी टाटांनी १९३२ मध्ये केली. त्यावेळी विमान कंपनीचं नाव टाटा एअरलाईन्स होतं. १९४६ मध्ये कंपनीचं नाव बदलून एअर इंडिया करण्यात आलं. १९५३ मध्ये केंद्र सरकारनं एअर इंडिया कंपनी ताब्यात घेतलं. तिचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यावेळी जेआरडींनी विरोध दर्शवला होता. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. संकटकाळी देशाच्या, देशवासीयांच्या मदतीला धावून गेलेली एअर इंडिया गेल्या काही वर्षांपासून स्वत:च संकटात सापडली. एअर इंडियावर ही वेळ का केली, कोणत्या चुकांमुळे कंपनी तोट्यात गेली, हे जाणून घेणं गरजेचं आहे.
एअर इंडियाची स्थापनाएअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये झाली. उद्योगपती जे. आर. डी. टाटांनी स्थापन केलेल्या एअरलाईन्सचं सुरुवातीचं नाव 'टाटा एअरलाईन्स' होतं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारनं टाटा एअरलाईन्सचं राष्ट्रीयकरण केलं. १९५३ मध्ये सरकारनं टाटा एअरलाईन्स ताब्यात घेतली. तिचं नावही बदलण्यात आलं. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी एअर इंडिया आणि देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी इंडियन एअरलाईन्स अशा दोन स्वतंत्र कंपन्या सरकारनं सुरू केल्या.एअर इंडिया, इंडियन एअरलाईन्सचं पुढे काय झालं?बँकॉक, टोकियो, न्यूयॉर्क, सिंगापूरसारख्या मार्गांवर सेवा देणाऱ्या एअर इंडियाची कामगिरी गेल्या काही वर्षांपर्यंत चांगली होती. एअर इंडियाच्या ताफ्यात सुरुवातीला बी ७०७ सारखी अत्याधुनिक विमानं होती. त्यानंतर बी ७४७ आणि ए ३१० सारखी विमानं एअर इंडियानं खरेदी केली. तो काळ एअर इंडियाच्या भरभराटीचा होता.
स्टार अलायन्सचा भाग होण्यासाठी विलीनीकरणस्टार अलायन्ससारख्या ग्लोबल अलायन्सचा भाग होता यावं हा विचारदेखील विलीगीकरणामागे होता, असं सांगितलं जातं. स्टार अलायन्सचा भाग होण्यासाठी कंपनीचं देशांतर्गत हवाई जाळं आणि आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रात चांगलं स्थान आवश्यक होतं. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स एकत्र आल्यास ते सहज शक्य होतं.
सरकारचं धोरण; एअर इंडिया, इंडियन एअरलाईन्सचं मरणइंडियन एअरलाईन्स देशांतर्गत हवाई मार्गांसह आशियातल्या शेजारच्या देशांमध्येही सेवा द्यायची. मात्र २००९ मध्ये यातल्या अनेक मार्गांवरील सेवा एअर इंडिया/इंडियन एअरलाईन्सला बंद करावी लागली. एकाच मार्गावर एअर इंडिया, इंडियन एअरलाईन्सनं सेवा देऊ नये, असे द्विपक्षीय करार सरकारनं अनेक देशांसोबत केले. त्यामुळे एअर इंडिया, इंडियन एअरलाईन्सला बऱ्याच मार्गांवर पाणी सोडावं लागलं. जिथे दोन्ही कंपन्या सेवा देत होत्या, तिथे एकाच कंपनीनं सेवा द्यावी, या निर्णयामुळे फायद्यात चाललेले मार्ग हातातून गेले. हीच संधी जेट एअरवेज आणि किंगफिशर एअरलाईन्सनं साधली. त्यामुळे एअर इंडियाला तोटा होऊ लागला. तर जेट एअरवेज, किंगफिशरच्या कमी तिकिट दरांमुळे इंडियन एअरलाईन्सला देशांतर्गत बाजारपेठेत घायाळ केलं. आर्थिक अडचणीत असलेल्या या दोन कंपन्यांचं विलीनीकरण सरकारनं केलं. त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी त्या वाढल्या.
एअर इंडियाची बलस्थानं काय?एअर इंडिया म्हणजे पांढरा हत्ती असं म्हटलं जातं. मात्र एअर इंडियाची काही बलस्थानंदेखील आहेत. एअर इंडियाकडे बी७८७ आणि ए३२० विमानांचा मोठा ताफा आहे. आंतरराष्ट्रीय मार्गांवर एअर इंडियाची स्थिती चांगली आहे. त्यातच स्टार अलायन्सचा सदस्य असल्यानं एअर इंडियाला महत्त्व आहे. विमानतळांवर प्रत्येक विमान कंपनीला ठराविक जागा लागते. या ठिकाणी विमानं उभी असतात. त्यांची डागडुजी होते. मुंबई, दिल्ली, बंगळुरूसारख्या महत्त्वाच्या विमानतळांवर एअर इंडियाकडे अशी जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
टाटांसाठी एअर इंडिया म्हणजे कंपनी नव्हे, त्याहून बरंच काही!टाटा समूहानं एअर इंडिया खरेदी केल्यास एक वर्तुळ पूर्ण होईल. १९५३ मध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना टाटा एअरलाईन्सचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. १९३२ मध्ये टाटा सन्सकडून टाटा एअरलाईन्सची स्थापना करण्यात आली. १९५३ मध्ये सरकारनं टाटा एअरलाईन्स ताब्यात घेतली. याबद्दल जेआरडी टाटांनी अतिशय स्पष्ट शब्दांत नेहरूंकडे नाराजी व्यक्त केली होती. जेआरडींनी जातीनं लक्ष घालून टाटा एअरलाईन्स उभी केली होती. विमानातले खाद्यपदार्थ, पडदे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींकडेही जेआरडींचं लक्ष असायचं. त्यामुळे सरकारनं घेतलेला निर्णय जेआरडींच्या मनाला लागला. विशेष म्हणजे टाटांचं मत फारसं विचारात न घेता एअरलाईन्सच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेण्यात आला. 'सरकारनं मागच्या दारानं केलेलं राष्ट्रीयकरण' अशा शब्दांत जेआरडींनी नेहरूंच्या निर्णयाचं वर्णन केलं होतं.